शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना खंडपिठाकडून जामीन संमत !

संभाजीनगर येथील हिंदु-मुसलमान जातीय दंगलीचे प्रकरण

संभाजीनगर – वर्ष २०१८ मध्ये शहरात झालेल्या हिंदु-मुसलमान जातीय दंगलीच्या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी येथील शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ३१ मे या दिवशी ६ मासांची शिक्षा आणि ५ सहस्र रुपये दंड ठोठावला होता; मात्र उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने जैस्वाल यांना २३ जून या दिवशी जामीन संमत केला आहे. त्यामुळे आमदार जैस्वाल यांची अटक टळून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१. ११ आणि १२ मे २०१८ या दिवशी शहरातील शहागंज भागात हिंदु अन् मुसलमान समाजात दंगल झाली होती. यामध्ये धर्मांधांनी अनेक दुकानांची तोडफोड करत काही दुकाने जाळली होती. यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी २ हिंदु तरुणांना अटक केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर आमदार जैस्वाल हे पोलीस ठाण्यात आले.

२. या वेळी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करतांना आमदार जैस्वाल यांनी ‘पोलीस केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. त्यांना त्वरित सोडून द्यावे’, अशी मागणी केली होती.

३. तथापि ‘आमदार जैस्वाल यांनी पोलिसांना शिवीगाळ करून पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारासमोरील पटलावरील काच फोडून सरकारी कामात अडथळा आणला आहे’, असा आरोप ठेवून पोलिसांनी विविध कलमांद्वारे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.