मराठी शाळांना सुगीचे दिवस !
काही वर्षांपूर्वी मराठी शाळांकडे मराठी पाल्यांनीच पाठ फिरवल्याने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी वाढू लागले. त्या वेळी आर्थिक, तसेच अन्य स्पर्धेत टिकाव धरू न शकल्याने अनेक सरकारी आणि खासगी मराठी शाळा बंद पडल्या. कोरोना संसर्गाने परिस्थिती पालटत असून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत असतांना मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. केवळ पूर्व प्राथमिक इयत्ताच नाही, तर पहिली ते पाचवीमध्ये मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या शहरी भागासमवेत ग्रामीण भागातही वाढत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून परत मराठी माध्यमात येत आहेत.
दोन वर्षांपूर्वी हेच पालक ‘सी.बी.एस्.ई.’, ‘आयबी’, ‘आय.सी.एस्.ई.’ यांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यांसाठी सर्व प्रयत्न पणाला लावत. ‘जगातील सर्व ज्ञान केवळ इंग्रजीत आहे’, असे पालकांना वाटत असे. यातूनच इंग्रजी शाळांना त्या सांगतील ते शुल्क देऊन अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत घातले. दळणवळण बंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला, तर काहींची वेतन कपात झाली. यामुळे अनेकांना या शाळांचे भरमसाठ शुल्क भरणे शक्य झाले नाही, तसेच भविष्यातही ते भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा प्रवाह आता पुन्हा मराठी माध्यमांकडे वळत आहे. मराठी शाळांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.
‘शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावे’, असे जागतिक स्तरावरील शिक्षणतज्ञ आणि मानशास्त्रज्ञ सांगतात; मात्र स्वातंत्र्योत्तर काळात देशपातळीवर सर्वच स्तरावर ‘इंग्रजीचा प्रचार’ हे जणू काही राज्यव्यवस्थेचे दायित्व आहे, असे चित्र निर्माण झाले. पूर्वीच्या काळी स्वभाषा आणि गुरुकुल पद्धती यांमुळेच आपण सक्षम होतो, हेच भारतीय विसरले. जगातील विकसित म्हणवून घेणार्या अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया अशांसह अनेक देशांत त्यांच्याकडील स्थानिक भाषाच शिकवल्या जातात. कोरोनाच्या निमित्ताने का होईना, परत एकदा मराठी शाळांना सुगीचे दिवस आले आहेत, हेही नसे थोडके ! यामुळे मराठी शाळांनी दायित्वाचे भान ठेवून सर्वंकष गुणवत्ता कायमस्वरूपी टिकवली, तर पालक इंग्रजी शाळांकडे ढुंकूनही पहाणार नाहीत !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर