‘एस्.एस्.आर्.एफ्.’चा बालसाधक चि. रेयांश रावत (वय ५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. रेयांश एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘२०.५.२०२१ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या अमेरिका, युरोप आणि आशिया खंडांतील साधकांसाठी एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगाला १५ देशांतील ७५ साधक उपस्थित होते. या सत्संगात चि. रेयांश रावत याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. रेयांशमध्ये इतरांचा विचार करणे, आज्ञापालन, भाव, सेवेची तळमळ आणि सौम्यता हे गुण आहेत. या सोहळ्याला ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या ४ संतांची चैतन्यमयी उपस्थिती लाभली.
या घोषणेनंतर रेयांशचे आई-वडील श्री. आशिष आणि सौ. शीतल यांचा भाव जागृत झाला होता. रेयांशच्या आध्यात्मिक प्रगतीची भेट देणार्या ईश्वराप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सौ. शीतल गेली ८ वर्षे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत, तसेच श्री. आशिष यांनी गेल्या वर्षी साधनेला आरंभ केला असून ते ‘ऑनलाईन’ सत्संगालाही उपस्थित असतात. त्यांनी रेयांशचे वेगळेपण सांगतांना त्याच्यात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याचे संगितले. सत्संगाला उपस्थित साधकांपैकी काहींचा रेयांशशी परिचय होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यातील प्रांजळपणा आणि खेळीमेळीने वागणे या गुणांमुळे त्याच्याशी जवळीक वाटत असल्याचे, तसेच त्याच्या सहवासात आनंद आणि समाधान मिळत असल्याचे सांगितले. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या रामनाथी (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रातील साधकांनी रेयांशची विविध गुणवैशिष्ट्ये सांगितली. रेयांशच्या रूपाने ६१ टक्के पातळीचे आणखी एक दैवी बालक ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या परिवाराला लाभल्याने या सत्संगाला उपस्थित असलेल्या साधकांना पुष्कळ आनंद झाला होता. कार्यक्रमाच्या वेळी काही बालसाधकांनी त्यांना रेयांशकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली.
सत्संग संपेपर्यंत रेयांश भावावस्थेत होता आणि मोकळेपणाने साधकांशी संवाद साधत होता. त्याच्याशी बोलून साधकांना शांत वाटले आणि आनंदही जाणवला. या लहान वयातही तो संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत शांतपणे बसला होता.
देवाच्या कृपेने आम्हाला हा सोहळा अनुभवता आला, यासाठी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– पू. (सौ.) भावना शिंदे आणि पू. (श्री.) देयान ग्लेश्चिच (२०.६.२०२१)
श्रीकृष्णाप्रती निरागस भाव असलेला महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. रेयांश !
१. गर्भधारणा
१ अ. गर्भधारणा झाल्यानंतर दुसर्या मासापासून हनुमानचालिसा म्हणणे : ‘मला गर्भधारणा झाल्यावर दुसर्या मासात अकस्मात्पणे माझ्या मनात हनुमानचालिसा म्हणण्याचा विचार आला. ‘हा विचार ईश्वराचा विचार आहे’, असे समजून मी हनुमानचालिसा म्हणायला आरंभ केला आणि ९ मासांपर्यंत हनुमानचालिसा म्हटली.
२. प्रसुती
२ अ. प्रसुतीच्या वेळी आणि नंतर पुष्कळ शारीरिक त्रास होणे : माझ्या प्रसुतीच्या वेळी मला पुष्कळ वेदना झाल्या आणि बाळाच्या जन्मानंतरही मला पुष्कळ त्रास झाला. मोठे शस्त्रकर्म करून माझी प्रसुती झाली. २१ दिवसांनंतर मला जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आणि पुन्हा ८ टाके घालावे लागले. त्यामुळे जवळ जवळ दोन मास मी अंथरुणावर पडूनच होते.
३. अनुभूती
३ अ. बाळाच्या जन्मापासून तो सवादोन वर्षांचा होईपर्यंत त्याला दूध पाजतांना आपोआप नामजप चालू होणे : प्रसुतीच्या तिसर्या दिवसानंतर मी बाळाला दूध पाजायला आरंभ केला. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू झाला. मी जितक्या वेळा त्याला दूध पाजत होते, तेवढ्या वेळेला माझा नामजप आपोआप चालू होत असे. असे सवादोन वर्षांपर्यंत होत राहिले. त्या दिवसांत माझी काही साधना होत नव्हती; परंतु तरीही माझा नामजप आपोआप होत असे.
४. चि. रेयांशची गुणवैशिष्ट्ये
४ अ. सात्त्विक पदार्थ खाण्याची आवड : चि. रेयांशला पहिल्यापासून केवळ दूध, दही, भात आणि फळे हेच पदार्थ आवडतात. आताही त्याचे वय ५ वर्षांपेक्षा अधिक होऊनही तो ‘जंक फूड’ किंवा मांसाहार कधीही करत नाही.
४ आ. चिकाटी : रेयांश एखादी गोष्ट चिकाटीने पूर्ण करतो. त्याला एखादी कृती करायला जमत नसेल, तर ती पूर्ण होण्यासाठी तो अथक प्रयत्न करतो. एवढे करूनही त्याला जमले नाही, तर तो इतरांना ‘माझे काय आणि कुठे चुकत आहे ?’, ते मला सांगा’, असे म्हणतो.
४ इ. सार्वजनिक स्थळी, तसेच शाळेत जाण्यास न आवडणे : रेयांशला कोणत्याही सार्वजनिक स्थळी जायला आवडत नाही. त्याला शाळेतही जायला कधीच आवडले नाही. प्रतिदिन त्याला शाळेत पाठवण्यासाठी आम्हाला पुष्कळ प्रयत्न करावे लागायचे. प्रत्येक दिवशी तो मला म्हणायचा, ‘‘आई, मला शाळेत जायला आवडत नाही. तू मला घरीच शिकव.’’
४ ई. मायेची आसक्ती नसणे आणि नातेवाइकांची कधी आठवण न काढणे : रेयांशला मायेतील गोष्टींविषयी आसक्ती वाटत नाही. काही वेळा त्याचे आजोबा, काका आणि पुष्कळदा त्याचे बाबा आम्हाला भेटायला येतात. ते भेटून गेल्यावर रेयांशला त्यांची आठवण येत नाही आणि तो त्यांच्याविषयी काही विचारतही नाही. ‘ते निघून गेल्यावर तो त्यांना जणू विसरून जातो’, असे मला वाटते.
४ उ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजप करणे : एकदा मी त्याला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाविषयी सांगितले. त्यानंतर ‘तो खेळतांना आणि चित्रे रंगवतांना दत्ताचा नामजप करतो’, असे माझ्या लक्षात आले.
४ ऊ. प्रतिदिन रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना करून आणि ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजातील श्रीकृष्णाचा पाळणा ऐकून झोपणे : मी प्रतिदिन रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना करून झोपते. रेयांशही ४ वर्षांचा असल्यापासून रात्री झोपतांना माझ्या समवेत कृष्णाला प्रार्थना करतो. एखाद्या दिवशी मी प्रार्थना करायला विसरले, तर तो मला प्रार्थनेची आठवण करून देतो. जुलै २०२० मध्ये त्याने प्रथमच ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजातील श्रीकृष्णाचा पाळणा ऐकला. तो त्याला पुष्कळ आवडला. तेव्हापासून रेयांश रात्री हा पाळणा ऐकूनच झोपतो.
४ ए. मित्रांना ‘श्रीकृष्ण झोका देत असल्यामुळे झोपाळा हलत आहे’, असे निरागसपणाने सांगणारा रेयांश ! : एके दिवशी मी आणि रेयांश झोपाळ्यावर बसलो होतो. वारा सुटला असल्यामुळे झोपाळा आपोआप हलत होता. ते पाहून रेयांशने मला ‘झोपाळा कसा हलतो ?’, असे मला विचारले. त्यावर मी ‘श्रीकृष्ण तुला झोका देत आहे. त्यामुळे झोपाळा हलत आहे’, असे सांगितले. काही वेळाने त्याचे काही मित्र खेळायला आले. त्या वेळीही झोपाळा हलतांना पाहून रेयांशने त्याच्या मित्रांना निरागसपणे सांगितले, ‘‘श्रीकृष्ण झोका देत असल्यामुळे झोपाळा हलत आहे.’’ ते ऐकून ‘हा काय सांगतो ?’, असे म्हणून मित्रांनी त्याची चेष्टा केली. या प्रसंगातून मला त्याच्यातील ‘निरागसपणा’ आणि ‘श्रीकृष्णाप्रतीचा भाव’ जाणवला. रेयांशच्या मित्रांना हे लक्षात न आल्याने त्यांनी त्याची चेष्टा केली.
५. रेयांशचा स्वभावदोष – चूक न स्वीकारणे
जेव्हा रेयांशकडून एखादी चूक होते आणि त्याविषयी कुटुंबियांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीतरी त्याला या चुकीची जाणीव करून देते, तेव्हा त्याला ती स्वीकारता येत नाही आणि तो रडतो.’
– सौ. शीतल रावत (चि. रेयांशची आई) (२९.३.२०२१)
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे वास्तव्यास आल्यावर सौ. शीतल यांना जाणवलेली चि. रेयांशची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी परात्पर गुरुदेवांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !‘गेले २ मास मी आणि चि. रेयांश रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास आहोत. या कालावधीत जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. १. इतरांशी जुळवून घेणेरेयांशने अल्पावधीतच आश्रमातील सर्व साधकांशी जुळवून घेतले. त्याला इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषा व्यवस्थित बोलता येत नाहीत, तरीही तो आश्रमातील प्रत्येक साधकाशी बोलतो. २. उत्तम निरीक्षणक्षमता आणि सतर्कता२ अ. एक साधिका खोलीच्या खिडक्या बंद करत असल्याचे पाहिल्यावर स्वतःहून प्रतिदिन संध्याकाळी खिडक्या बंद करणे : एके दिवशी संध्याकाळी रेयांशने सौ. योया वाले यांना खोलीच्या खिडक्या बंद करताना पाहिले. ते पाहून तोही तेथील इतर खिडक्या बंद करू लागला. त्यानंतर रेयांशने प्रतिदिन संध्याकाळी खिडक्या बंद करण्याची सेवा स्वतःहून करायला आरंभ केला आहे. २ आ. एका साधिकेने कागदावर नामजपाचे मंडल घातल्याचे पाहून आईलाही तसे करण्यास सांगणे : एकदा श्रीमती मारिया यांनी कागदावर काही सूत्रे लिहून त्याभोवती श्रीकृष्णाच्या नामाचे मंडल घातले. हे रेयांशने पाहिले. त्या दिवशी संध्याकाळी त्याने मला कागदाचे चार तुकडे करायला लावले आणि त्याच्या चारही बाजूंना ‘सफरचंद अन् केळी’ असे लिहायला सांगितले. ‘मारियाआजींची कागदावर मंडल घालण्याची कृती रेयांशच्या व्यवस्थित लक्षात होती’, हे पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. त्या वेळी ‘कागदाच्या चारही दिशांना ‘केळी आणि सफरचंदे’ असे न लिहिता श्रीकृष्णाचे नाव लिहायचे असते’, असे मी त्याला समजावून सांगितले. २ इ. दिवसभर खेळत असूनही योयाताईंच्या आध्यात्मिक त्रासाकडे सतर्कतेने लक्ष देणारा रेयांश ! : एके दिवशी सौ. योया वाले यांना एकदाही आध्यात्मिक त्रास झाला नाही. त्या रात्री रेयांश मला म्हणाला, ‘‘आज योयाताईंची स्थिती चांगली होती. श्रीकृष्णाने त्यांना (सूक्ष्मातून) त्रास देणार्या राक्षसाला नष्ट केले असावे.’’ रेयांश दिवसभर खेळत असूनही त्याचे योयाताईंच्या विषयीचे निरीक्षण पाहून मला आश्चर्य वाटले. २ ई. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने योयाताईंना आध्यात्मिक त्रास होत असल्याचे अचूक ओळखून रेयांशने मारियाआजींना त्यांच्या साहाय्यास जाण्यास सांगणे : एकदा रेयांश श्रीमती मारियाआजींसह बाजूच्या एका मंदिराजवळ फिरायला गेला होता. त्या वेळी त्याला कुणाचा तरी आवाज ऐकू आल्यासारखे जाणवले. तो मारियाआजींना म्हणाला, ‘‘तुम्हाला आता जायला हवे; कारण योयाताईंना साहाय्याची आवश्यकता आहे’, मला असे वाटते.’’ आजींना तेव्हा कुणाचाही आवाज ऐकू आला नव्हता; पण योयाताईंना त्या वेळी आध्यात्मिक त्रास होत होता. नंतर हा प्रसंग मारियाआजींनी मला सांगितला. ३. सेवेची आवड असल्याने कोणतीही सेवा आनंदाने पूर्ण करणेरेयांशला सतत सेवा करायला आवडते. तो कोणतीही सेवा आनंदाने पूर्ण करतो आणि इतर साधकांनाही त्यांच्या सेवांमध्ये साहाय्य करतो. तो सेवेच्या संदर्भात पुष्कळ उत्साही आणि क्रियाशील आहे. त्याला रात्रीही आश्रमातील सेवा करायच्या असतात. ‘रात्रीच्या वेळी कोणतीही सेवा नसते’, असे त्याला समजावून सांगणे मला अवघड जाते. यावरून काही वेळा तो माझ्याशी भांडतोही. ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी जीवनातील सर्व इच्छांची पूर्ती केल्याविषयी त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !‘परात्पर गुरुदेव, मी आपले ऋण कोणत्याही जन्मात आणि कधीच फेडू शकणार नाही. माझ्या जीवनातील सर्व इच्छांची पूर्ती आपण केली आहे. आता आपल्या कृपेने मी माझ्या नोकरीचाही त्याग करू शकले. निवृत्तीची प्रक्रिया आणि माझी येथे रामनाथी आश्रमात येण्याची इच्छासुद्धा आपण त्वरित पूर्ण केली. मी आणि माझा पुत्र (रेयांश) येथे आपल्या वैकुंठधामात आलो. आपल्या कृपेनेच कोणतीही अडचण न येता हे सर्व अवघ्या ६ मासांत झाले. ५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाची तळमळ लागल्याने त्यांच्या भेटीसाठी केलेली प्रार्थना !परात्पर गुरुदेव, माझे मन पुष्कळ आतुर आणि उत्सुक आहे की, येथे आपल्या एवढ्या समीप येऊनसुद्धा आम्हाला अजून आपले दर्शन होऊ शकले नाही. आम्हाला आपल्या चरणकमली लवकर बोलावून घ्यावे. परात्पर गुरुदेव, आता या जीवनात मी पुन्हा भटकू नये. माझ्यामध्ये केवळ आणि केवळ साधना करून आपल्या चरणी येण्याची अखंड तळमळ वाढवावी. केवळ देवाच्याच कृृपेने मला रेयांशसारखा दैवी बालक प्राप्त झाला आहे. गुरुदेवा, आपण मला एवढे सामर्थ्य द्यावे की, त्या बळावर मी एक ‘आदर्श माता’ बनून रेयांशला आपल्या चरणी अर्पण करू शकीन.’ – गुरुचरणी, सौ. शीतल रावत (चि. रेयांशची आई) (२९.३.२०२१) |
|