बांधकाम व्यावसायिकाच्या लाभासाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई !
पुणे, २४ जून – येथील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोचले असता या वेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पोलीस आणि नागरिक यांमध्ये झटापट झाली, तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचे स्थानिक नगरसेवकांनी म्हटले आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या लाभासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला आरंभ करण्यात आला आहे. सध्या आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त आहे.
VIDEO: पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई, नागरिकांचा अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न pic.twitter.com/mBqW04I0en
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2021
१. ‘आम्हाला या कारवाईसंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी. त्यानंतर कारवाई करा’, अशी नागरिकांची मागणी आहे.
२. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले, तरी राजकीय आदेशाविना ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.
३. याविषयी शिवसेना नेत्या नीलम गोर्हे म्हणाल्या, ‘‘ओढ्यामागील परिसरातील कोणतेही स्थलांतर करण्यात आलेले नाही. फक्त एस्.आर्.ए.साठी जी जागा रिकामी करायची आहे, तेथे अतिक्रमण आणि सुरक्षा यांच्या नावाखाली तुघलकी पद्धतीने कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महापालिका आयुक्तांना निरोप दिला असतांनाही कारवाई केल्याने आश्चर्य वाटत आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ, बिडकर आणि मुरलीधर मोहोळ यांनी विकासकासमवेत बैठक घेऊन सुरक्षिततेच्या नावाखाली लोकांच्या घरावर नांगर फिरवला आहेत.’’
४. भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करू नये, असे ठरवले होते, तरीही ही कारवाई का झाली ? राज्य सरकारशी चर्चा करून प्रशासनावर कारवाई करण्याविषयी विचारणा करू.’’
काय आहे प्रकरण ?
आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता ६० टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.