कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळला नाही; मात्र शासन सतर्कता बाळगणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, २३ जून (वार्ता.) – कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळलेला नाही. हा नवीन विषाणू गोव्याच्या शेजारील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्याने गोवा शासन स्थितीवर लक्ष ठेवून आहे. गोव्याबाहेरून आलेल्या व्यक्तींची चाचणी करणे आणि संशय आढळल्यास संबंधित व्यक्तीला अलगीकरणात ठेवणे, ही प्रक्रिया गोव्याच्या सीमांवर चालू केली आहे. सिंधुदुर्गला लागून असलेल्या सीमेवर अधिक लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय, उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, व्हिक्टर रुग्णालय आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय येथील नमुने नियमितपणे दर १५ दिवसांनी चाचणीसाठी पुणे येथे पाठवले जात आहेत. गोव्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेत ‘डेल्टा’ विषाणूचे २६ रुग्ण सापडले होते; मात्र आजपर्यंत ‘डेल्टा प्लस’चा एकही रुग्ण सापडलेला नाही. ‘डेल्टा प्लस’ विषाणूसंदर्भात केंद्राकडून अजून मार्गदर्शक तत्त्वे आलेली नाहीत. राज्याच्या सीमांवर प्रयोगशाळा खुल्या करण्यासंदर्भात शासकीय प्रस्तावाला खासगी संस्थांचा प्रतिसाद लाभलेला नाही. कोरोनाच्या विविध प्रकारच्या विषाणूंचे चाचणी केंद्र गोव्यात उभारण्यासंदर्भात शासन विचार करत आहे.’’