कणकवलीत कोरोना ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण रहात असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय चालू
कणकवली – कणकवली शहरात परबवाडी येथील ‘कामत सृष्टी’ या निवासी संकुलात कोरोना ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण सापडल्याने हे संकुल आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे घशातील स्राव (स्वॅब) तपासणीसाठी घेण्यात येत आहे. हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पहिला कोरोना ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण कणकवली शहरात सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार आर.जे पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, नगरपंचायतीचे गटनेते संजय कामतेकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सतीश टाक, आरोग्यसेविका, नगरपंचायतीचे कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे अन्य कर्मचारी यांनी ‘कामत सृष्टी’ निवासी संकुलाला भेट दिली. या वेळी आरोग्य विभागाकडून चालू असलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.