गुरुकृपायोगानुसार साधना करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार आणि भागीदार होऊया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या भागातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन अखंड बलोपासना आरंभ’ उपक्रम !
पुणे – प्रत्येक मनुष्यावर पितृ ऋण, गुरुऋण, ऋषिऋण आणि समाजऋण असते. आई-वडिलांची सेवा करून त्यांचे ऋण फेडता येते. ऋषींनी सांगितलेली साधना करून त्यांचे ऋण फेडता येते. गुरूंनी सांगितलेली साधना समाजाला सांगून म्हणजे समष्टी साधना करून समाजऋण आणि गुरुऋण फेडता येते. यासमवेत समष्टी साधनेसह व्यष्टी साधना करणेही आवश्यक आहे. साधना करतांना केवळ क्षात्रतेज नाही, तर त्यासह ब्राह्मतेजही आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी ईश्वर पाठीशी असावा लागतो. गुरुकृपायोगानुसार अष्टांग मार्गाने केलेली साधना, हा ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग आहे. या मार्गाने साधना केल्यास आत्मविश्वास निर्माण होऊन धर्माचे कार्य करण्यास बळ मिळते. तसेच कोणत्याही परिस्थितीला स्थिरपणे सामोरे जाता येते. वाणीमध्ये चैतन्य निर्माण होते. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार अन् भागीदार होऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या भागासाठी चालू असलेल्या ‘अखंड बलोपासना आरंभ’ या उपक्रमात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ ४०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला. या उपक्रमा अंतर्गत उपस्थितांना स्वरक्षण प्रशिक्षणाचे विविध प्रकार शिकवण्यात आले.
कार्यक्रमाचा आरंभ शंखनाद आणि प्रार्थना यांनी झाला. पुणे येथील कु. चारुशीला शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर रत्नागिरी येथील कु. नारायणी शहाणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
१. शामल जाधव, पुणे – या वर्गामुळे शौर्यजागृती झाली. आरंभी आणि शेवटी घेतलेल्या नामजपामुळे चैतन्य आणि आनंद मिळाला. वर्गातून व्यायाम शिकण्यासह आध्यात्मिक दिशाही मिळाली.
२. युवराज, गोवा – व्यायामप्रकार करतांना चैतन्य मिळून शरिरातील त्रासदायक शक्ती निघून जात आहे, असे जाणवले. वर्गात सांगितला जाणारा शौर्यप्रसंग ऐकतांना ‘तो प्रसंग आपल्या समोर घडत आहे’, असे वाटत होते. व्यायामप्रकार करतांना घाम येत होता; पण भगवंताचे स्मरण केल्यावर शांत वाटत होते. या वर्गातून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज वाढते.
३. सुजाता पाटील, चिंचवड – वर्ग झाल्यानंतर घरातील कामे करण्याचा कंटाळा येत नाही. शौर्यप्रसंग ऐकतांना त्यातून चैतन्य मिळत असल्याचे जाणवते. ‘त्या प्रसंगात सांगितल्याप्रमाणे आपल्यातही क्षात्रतेज निर्माण व्हावे’, असे वाटते.
४. देवीप्रसाद, गोवा – जेव्हा वर्ग चालू झाले, तेव्हा मला कोरोना संसर्ग झाला होता. त्याही स्थितीत वर्गाला जोडल्यापासून स्वतःमध्ये पुष्कळ सकारात्मकता जाणवली, तसेच पुष्कळ आनंद आणि उत्साह निर्माण झाला.
५. संजना कुराडे, कोल्हापूर – वर्गामुळे आत्मविश्वास निर्माण होऊन शौर्यजागृती झाली. व्याख्यान ऐकल्यानंतर समष्टी सेवा आणखी चांगली करण्याचा निश्चय झाला. आता भवानीमातेने दिलेला भंडारा सगळीकडे उधळून अनेक युवक-युवतींना स्वरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडवण्याची इच्छा होत आहे.
६. वनी छत्रे, गोवा – बलोपासनावर्गातून स्वभावदोष न्यून होत असल्याची अनुभूती आली. तसेच आध्यात्मिक त्रास कमी होऊन साधनेचे महत्त्व मनाला पटले. वर्गाला जोडतांना मला बरे वाटत नव्हते; परंतु सद्गुरु (कु.) स्वातीताई यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर बरे वाटले.
७. आकांक्षा घाडगे, पुणे – बलोपासनावर्गातून पुष्कळ शौर्यजागृती झाली. ‘आता स्वतःपुरते मर्यादित न रहाता हिंदु धर्माची मशाल हाती घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत थांबायचे नाही’, असा निश्चय केला आहे.