शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे !

हिंदूंची देवस्थाने भक्तांकडे नव्हेत, तर राजकीय पक्षांच्या कह्यात देणे, हा हिंदु धर्मावरील घोर अन्याय होय. केवळ आर्थिक उत्पन्न देणारी मंदिरे कह्यात घेऊन दूरवस्था झालेल्या मंदिरांकडे दुर्लक्ष करणे, हा तुघलकी प्रकारच आहे. धर्मनिरपेक्षतेचा हा बेगडीपणा हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करतो. हिंदु राष्ट्रात हिंदूंच्या मंदिरांचे दायित्व शासनकर्त्यांच्या हाती नव्हे, तर भक्तांकडे असेल !

शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान

मुंबई – शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील महामंडळांच्या पदांचे वाटप आणि देवस्थानच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या यांसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या सह्याद्री अतिथीगृह येथे २२ जून या दिवशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. बैठकीनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘नियुक्त्यांविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घोषित करतील’, असे सांगितले. ‘महामंडळांच्या वाटपाचा निर्णय लवकरच होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणे हे वाटप होईल’, असे या वेळी शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी या देवस्थानांचे अध्यक्षपद शिवसेना-भाजप महायुतीकडे होते.