साधकांनो, संत आणि सद्गुरु यांच्या सत्संगाचा लाभ करवून घेऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करवून घेऊया !
‘ऑक्टोबर २०२० मध्ये देहली सेवाकेंद्रातील आम्हा साधकांकडून त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होत होत्या. तेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आम्हाला कठोर शब्दांत त्याची जाणीव करून द्यावी लागली. साधकांचे प्रयत्न अल्प होऊन साधकांची अपेक्षित प्रगती होत नसल्याची त्यांना पुष्कळ खंत वाटत असल्याचे जाणवले.
१. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर त्याने ‘साधकांना सहज मिळालेल्या गोष्टींचे मूल्य नसल्याने त्यांच्याकडून चुका होत आहेत’, असे सांगणे :
एकदा मी दूध आणण्यासाठी जात असतांना श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केली, ‘देवा, आमच्याकडून अशा चुका पुनःपुन्हा का होत आहेत ? देवा, आम्ही कुठे अल्प पडत आहोत, हे तूच सांग.’ तेव्हा देवाने सांगितले, ‘आपल्याला एखादी गोष्ट सहज किंवा कष्ट न करता मिळत असल्यास आपल्याला त्याचे मूल्य नसते. जसे समुद्रकिनार्यावर १ बैलगाडी भरून वाळू १ सहस्र रुपयांना मिळते; मात्र बोटाच्या चिमटीत मावणारा लहानसा हिरा मिळवण्यासाठी लक्षावधी रुपये मोजावे लागतात. हिरे, माणिक आणि मोती मिळवायला पुष्कळ मोल द्यावे लागते; म्हणून त्याचे महत्त्व अधिक आहे.’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांचा उद्धार होण्यासाठी त्यांना संत आणि सद्गुरु यांचा सत्संग उपलब्ध करून देणे; मात्र साधकांना त्याचे महत्त्व वाटत नसणे :
हे ऐकून देवाने मला सुचवले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांचा उद्धार होण्यासाठी आश्रम आणि प्रसार येथील साधकांना संत अन् सद्गुरु यांचा सत्संग उपलब्ध करून दिला आहे; मात्र आम्हाला त्याचे महत्त्व वाटत नाही. आम्ही त्यांचा लाभ करवून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे साधकांमध्ये कृतज्ञताभाव कायम टिकून रहात नाही. आमच्यातील आळस, ध्येयाचा विसर पडणे आणि अहं यांमुळे आमच्याकडून संत अन् सद्गुरु यांना अपेक्षित असे प्रयत्न सातत्याने होत नाहीत.’
३. प्रार्थना :
‘हे दयाळू गुरुमाऊली, आमचा संत आणि सद्गुरु यांच्या चरणी अखंड कृतज्ञताभाव टिकून राहू दे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हा सर्व साधकांकडून साधनेचे प्रयत्न होऊ देत’, अशी तुमच्या श्री चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली (२४.२.२०२१)