पोर्तुगिजांनी सुसंस्कृतीच्या नावाने गोमंतकियांवर अमानुष अत्याचार केले ! – नागेश करमली, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
पणजी, २२ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी सुसंस्कृतीच्या नावाने गोमंतकियांवर अमानुष अत्याचार केले. ‘धर्मसमीक्षण’च्या (इन्क्विजीशन) नावाने गोमंतकियांवर अत्याचार केले; मात्र गोवा स्वतंत्र झाल्याने आता समाधान वाटते, असे मत गोव्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी व्यक्त केले. गोवा क्रांतीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कोकणी भाषा मंडळाने आयोजित केलेल्या एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली बोलत होते.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली गोवा मुक्ती लढ्याविषयी ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्याच्या इतिहासात ‘गोवा क्रांतीदिना’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. राम मनोहर लोहिया, टी.बी. कुन्हा, डॉ. ज्युलियाव मेनेझिस, पुरुषोत्तम काकोडकर आदींनी १८ जून या दिवशी गोवा मुक्ती लढ्याला प्रारंभ केला. या दिवसापासून गोव्यातील तरुण स्वखुषीने या लढ्यात सहभागी झाले. आपणही या लढ्यात सहभाग घेतला आणि कारावासही भोगला; मात्र आज काही जण आमची चेष्टा करत दिसतात. याविषयी दु:ख वाटते. गोवा मुक्ती लढ्यात ख्रिस्ती समाजातील लोकांनीही सहभाग घेतला, हे कुणीही विसरू नये.’’