दक्षिण गोव्यात ३ वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत १०, तर तडीपारीची ५९ प्रकरणे प्रलंबित
केवळ मोठमोठ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून गुन्हेगारी अल्प होणार नाही ! त्यासाठी कठोर आणि तत्पर कारवाई आवश्यक !
पणजी, २२ जून (वार्ता.) – दक्षिण गोव्यात वर्ष २०१८ पासून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आतापर्यंत एकूण १० जणांवर कारवाई करण्यासंबंधीचा आणि गुन्हेगारी कारवायांत सहभागी असल्याने ५९ जणांना तडीपार करण्यासंबंधीचा अहवाल दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांना पाठवण्यात आला आहे. हे दोन्ही प्रस्ताव प्रलंबित असल्याने एकावरही कारवाई झालेली नाही. दक्षिण गोव्यात ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ (रा.सु.का.) १७ जूनपासून लागू करण्यात आला आहे.
राज्य सरकारने दक्षिण गोव्यात ‘रा.सु.का.’ लावल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दक्षिण गोवा जिल्ह्यात गेल्या वर्षभरातील घटना पहाता यामध्ये उघडपणे हत्यारांचा वापर झालेला आहे. यामुळे कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मडगाव येथे सुवर्णकाराची बंदुकीने गोळी झाडून हत्या, फातोर्डा येथे अट्टल गुन्हेगार अन्वर शेख याच्यावर दुसर्या टोळीतील गुंडांनी कोयता आणि बंदुकीची गोळी झाडून केलेले जीवघेणे आक्रमण, नावेली येथील युवकावर कोयता आणि लोखंडी दांडा यांच्या साहाय्याने झालेले आक्रमण, आदी अनेक भीषण घटना घडल्या आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्याने यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी दक्षिण गोव्यात सरकारने ‘रा.सु.का.’ लावला आहे. या कायद्यानुसार समाजविघातक काम करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांना दिले गेले आहेत. हा एक नित्याचा आदेश असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्टीकरणादाखल सांगण्यात आले आहे.