सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकाराचा पहिला रुग्ण सापडला
कणकवली येथील बाधित भागात उपाययोजना चालू
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकाराचा (स्ट्रेनचा) पहिला रुग्ण कणकवलीतील परबवाडी येथे सापडला असून, या भागात ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या (आय.सी.एम्.आर्.च्या) मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी २२ जूनला दिली.
याविषयी डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘आय.सी.एम्.आर्.’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोधमोहीम चालू आहे. ‘इली’, ‘सारी’ या आजारांतील रुग्ण आणि लक्षणे यांविषयीचे सर्वेक्षण चालू आहे. त्याचसमवेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करण्यात येत आहे. संसर्ग पुन्हा होत आहे का ? यासाठीही शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
नागरिकांनी कोरोनासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील ‘नियमित हात धुणे, मुखपट्टी वापरणे (मास्क वापरणे) आणि सुरक्षित अंतर ठेवणे’, या त्रिसूत्रीचे नियमित पालन करावे अन् ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे.