प्रसिद्धीमाध्यमे कोरोनाविषयीची चुकीची माहिती पसरवत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आरोप !

जर प्रसिद्धीमाध्यमे चुकीची माहिती पसरवत असतील, तर तेलंगाणा सरकार कारवाई का करत नाही ? कि राव केवळ निराधार आरोप करत आहेत ?

वारंगळ (तेलंगाणा) – कोरोनाविषयी प्रसिद्धीमाध्यमे चुकीची माहिती पसरवत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असा आरोप तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे.

के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की,

१. कोरोना नसतांनाही सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना जागा मिळत होती का ? डॉक्टर रुग्णांना कधीच उपचार नाकारत नाहीत. त्यांना यामागील कारण ठाऊक आहे की, गरीब केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेऊ शकतात. त्यामुळे ते रुग्णांना जागा नसल्यास भूमीवरच बसवतात आणि त्यांचे उपचार करतात; मात्र प्रसिद्धीमाध्यमे काय करतात, तर छायाचित्रे काढतात अन् सांगतात, ‘रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये भूमीवर झोपायला लागते.’

२. मला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा ‘पॅरासिटमॉल’ आणि रोगप्रतिकारशक्तीची औषधे खाऊन मी बरा झालो. काळी बुरशी, पिवळी बुरशी अशा आजारांविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. कुठली वृत्तवाहिनी आहे कि कोणते दैनिक मला ठाऊक नाही. ही बुरशी जिवंत आहे कि निर्जीव (हेसुद्धा ठाऊक नाही); मात्र लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. त्यामुळे मी सांगतो, या वृत्तवाहिन्यांना शाप लागेल.