गोवा शासन ‘गोवा मेन’ या नावाने मटका व्यवसाय चालवत असल्याचा माजी आमदार किरण कांदोळकर यांचा आरोप

या गंभीर आरोपावर शासनाने तात्काळ खुलासा करणे आवश्यक !

किरण कांदोळकर

पणजी, २२ जून (वार्ता.) – गोवा शासन पोलिसांच्या सहकार्याने ‘गोवा मेन’ या नावाने मटका व्यवसाय चालवत असल्याचा सनसनाटी आरोप ‘गोवा फॉरवर्ड’चे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी केला आहे.

माजी आमदार किरण कांदोळकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्यातून मटका व्यवसाय हद्दपार करायचा असेल, तर त्यांना प्रथम दक्षिण गोव्यात ‘बाबू’ या नावाने कार्यरत असलेली व्यक्ती चालवत असलेला मटका व्यवसाय बंद करावा लागेल. ही व्यक्ती कार्यालयातून बसून ‘कमिशन’ घेत असते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मटका व्यवसाय गोव्यात चालू आहे’, याची पोलीस अधिकार्‍यांच्या समोर स्वीकृती देणे, हे पोलीस खात्याची कार्यक्षमता न्यून झाल्याचे दर्शवते.’’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी कोलवाळ पोलीस ठाण्याचे उद्घाटन करतांना शासनाच्या विरोधात बोलणार्‍या ‘किरण मटकेकार’ या व्यक्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार किरण कांदोळकर यांनी हा आरोप केला. (लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता एकजुटीने गोव्यातून मटका आणि सर्वच प्रकारचे जुगार हद्दपार करणे आवश्यक आहे ! – संपादक)