शाळेत मुलीची प्रवेश प्रक्रिया न झाल्याने मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या कह्यात !
पुणे, २२ जून – ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्या शैलेश शिंदे यांना पुणे पोलिसांनी घोरपडी येथून २१ जून या दिवशी कह्यात घेतले आहे. त्यानंतर मुंबईच्या मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून पुणे पोलिसांकडून त्यांना कह्यात घेतले. शैलेश शिंदे यांच्या मुलीला शाळेत प्रवेश मिळाला नसल्याने चिडलेल्या शैलेश यांनी गृह विभागाला धमकीचा ई-मेल केला, असे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.
१. ‘मुलांचे शैक्षणिक वर्ष हे हॅचिंग शाळेने वाया घालवले. आम्हाला न्याय मिळत नाही’, असा आरोप शैलेश शिंदे यांच्यासमवेत संतोष पोलकमवार या पालकांनीही केला आहे.
२. आम्हाला न्याय मिळाला नाही; म्हणून हा पेपर बॉम्ब होता, असे केल्यानंतर तरी सरकार आम्हाला न्याय देईल कि नाही, हे आम्हाला ठाऊक नाही.
३. शिक्षण विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री यांना आम्ही १५० ई-मेल केले; मात्र एकाही ई-मेलचे उत्तर आम्हाला मिळाले नाही.
४. आमच्या मुलांना शिक्षणापासून हॅचिंग शाळेने वंचित ठेवले आहे. आम्ही शिक्षण विभागाकडे तक्रार केली; म्हणून आम्हाला शाळेकडून त्रास देण्यात येत आहे.
५. शाळा आमची मुले पाचवीमध्ये असल्यापासून त्रास देत आहे. मुलांना जूनमध्ये उत्तीर्ण करण्याऐवजी सप्टेंबरमध्ये उत्तीर्ण करण्यात येते. वर्ष २०१६ पासून हा विचित्र प्रकार शाळेत चालू असल्याचा आरोप पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे.
धमकी देणारा ई-मेल मिळाल्यावर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला; पण कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.