अन्य मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
आपल्या जातीचा उत्कर्ष व्हावा, यासाठी तो समाज आणि समाजाचे नेते यांनी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे; परंतु सध्याच्या आपत्काळात आरक्षणाचे सूत्र रेटून धरून प्रत्येक समाजाने स्वत:चा वेगळा वाटा मागणे कितपत योग्य आहे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जातीच्या आधारे लाभ मिळवण्यापेक्षा स्वत:मध्ये तशी पात्रता निर्माण करण्यासाठी समाजाला पात्र बनवणे, हे खर्या लोकनेत्यांचे दायित्व आहे. तसे न करता मतांसाठी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवणे, हे ना त्या समाजासाठी, ना त्या राष्ट्रासाठीही हिताचे ठरेल !
मुंबई – कुणाकडून कितीही दबाव आला, तरी अन्य मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. आम्ही मंत्री असलो, तरी निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे छगन भुजबळ यांच्यासमवेत ही भूमिका आम्ही मांडली असून ही चर्चा सकारात्मक झाली. सरकार यासाठी अनुकूल आहे, असे या वेळी वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवार यांनी मांडलेली भूमिका शासनाने मान्य केल्यास जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका लांबण्याची शक्यता आहे.