केंद्र सरकारने फेसबूकला पर्यायी स्वदेशी ‘ॲप’ विकसित करावे ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘फेसबूकचा हिंदुद्वेष’ या विषयावर विशेष परिसंवाद !
पुणे – आज देशातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना विदेशी आस्थापनाकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूकने ‘सुदर्शन न्यूज’ सारख्या हिंदुत्वनिष्ठ वाहिनीच्या पानावर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणार्या डॉ. झाकीर नाईक, हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे अकबरुद्दीन ओवैसी, पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी संघटना यांची फेसबूक आणि ट्विटर आदी सामाजिक माध्यमांवरील खाती अद्यापही चालू आहेत. ट्विटरकडून देशाच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ‘ब्ल्यू टीक’ (कोणत्याही ट्विटर खात्याची सत्यता दर्शवणारी खूण) काढले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, तरी सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून विदेशी लोक आपल्यावर राज्य करत आहेत. आपण कधीपर्यंत विदेशी ‘फेसबूक’ला सहस्रो कोटी रुपये कमवून देणार आहोत ? हे थांबवण्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर केंद्र सरकारने फेसबूकप्रमाणे स्वदेशी ‘ॲप’ विकसित केले पाहिजे, असे आवाहन तेलंगाणा येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादाच्या अंतर्गत ‘फेसबूकचा हिंदुद्वेष’ या विषयावर आयोजित विशेष परिसंवादात बोलत होते. या चर्चासत्रात बिहार येथील ‘भारत जागृती सोशल नेटवर्कींग ग्लोबल साईट’चे संस्थापक श्री. भारत भूषण, देहली उच्च न्यायालयाचे अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सहभाग घेतला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर श्री. अरविंद पानसरे यांनीही त्यांची भूमिका एका व्हिडिओद्वारे मांडली. या वेळी जिज्ञासूंनी ‘हिंदु धर्माचा प्रचार ‘फेसबूक’वर अवलंबून नसून आपण पर्यायी व्यवस्था करायला हवी’, असे मत व्यक्त केले. तसेच हिंदुद्वेषी ‘फेसबूक’चा निषेध करून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या कार्यक्रमाचा लाभ हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ, यू ट्यूब आणि ट्विटर यांच्या माध्यमातून ९ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी आणि जिज्ञासूनी यांनी लाभ घेतला. या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर ‘Facebook_Suppress_Hindu_Voices’ या नावाने चालवलेल्या ‘ट्रेंड’ला (ट्विटर या सामाजिक माध्यमावर एखाद्या विषयावर घडवलेली चर्चा) ७२ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करून धर्मप्रेमींनी फेसबूकचा निषेध केला. फेसबूकवर बंदी घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहिमेत ६ सहस्र ९००हून अधिक धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. |
हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संघटित होऊन नोंदवावी ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय
१. फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांचे ‘हेट स्पीच’च्या (प्रक्षोभक भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याउलट इतर धर्मांतील लोक त्यांच्या धर्माविषयी कुठे उलट-सुलट बोलले जात नाही ना ? यावर लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे मात्र ‘मला काय त्याचे ? बोलले तर राहू दे, मला फरक पडत नाही’, अशा विचारसरणीचे लोक असल्याने फेसबूकसारख्या हिंदुद्वेष्ट्या आस्थापनांचे फावते. हे रोखण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास आपण जागरूक राहून संघटित व्हायला हवे, तसेच याविषयी तक्रार नोंदवली पाहिजे.
२. विदेशी आस्थापने भारतातील हिंदुत्वाचे विचार रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण विरोध केला नाही आणि संघटित झालो नाही, तर सामाजिक माध्यमांवर सनातन धर्माचा प्रसार करणे अन् हिंदुत्वाविषयी बोलणे कठीण होईल. फेसबूकच्या विरोधात एक दबावगट निर्माण करायला हवा. त्यामुळे फेसबूकला भारतीय राज्यघटना, अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानावे लागेल आणि सर्वांना समान न्याय देण्यासाठी आपण त्यांना भाग पाडू शकू.
३. फेसबूकच्या विरोधात तक्रारी द्यायला हव्यात. याचसमवेत फेसबूकला याविषयी नोटीस दिल्यास ते भारतीय राज्यघटनेचा आणि नागरिकांचा सन्मान करतील. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता ते कुणाचेही पान बंद करणार नाहीत.
फेसबूककडून ‘पोस्ट’च्या ‘रिच’ अल्प केले जाणे, हे एक षड्यंत्र ! – भास्कर भूषण, भारत जागृती सोशल नेटवर्कींग ग्लोबल साईट, बिहार
फेसबूककडून हिंदु नेते आणि कार्यकर्ते यांची पाने बंद केली जातात. तसेच फेसबूकवर हिंदु धर्माविषयी विचार व्यक्त करण्यासही मनाई आहे. दुसरीकडे ख्रिस्त्यांच्या चंगाई सभेची पाने विनाअडथळा धर्मांतराचे काम करत आहेत. पानांवर बंदी घालणे, ‘पोस्ट रिच’ (किती लोकांपर्यंत एखादे लिखाण पोचले याची संख्या) अल्प करणे यांसारखे स्वतःचे नियम फेसबूककडून बनवले जातात; पण हे एक प्रकारचे षड्यंत्र असून याला विरोध करण्यासाठी वैध मार्गाने दबावगट निर्माण करून दबाव टाकायला हवा. हिंदु विचारांसाठी फेसबूकची ‘फिल्टर सिस्टीम’ आहे. त्यामुळे ‘पोस्ट’ऐवजी ‘लाईव्ह व्हिडिओ’च्या माध्यमातून प्रसार-प्रचार करायला हवा.
केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विदेशी माध्यमांची वर्चस्वता रोखायला हवी ! – अरविंद पानसरे, मुख्य वार्ताहर, दैनिक ‘सनातन प्रभात’
विचार पोचवणार्या एका माध्यमावर दुसर्या माध्यमाने कोणतीही पूर्वकल्पना न देता (फेसबूकने दैनिक ‘सनातन प्रभात’वर) घातलेली बंदी अन्यायकारक आहे. स्वदेशी विचार माध्यमावर विदेशी विचार माध्यमाने घातलेला हा एक प्रकारचा घाला आहे. देशात काय दाखवायचे, हे विदेशी माध्यमे ठरवायला लागली, तर देशाची सुरक्षितता धोक्यात येईल. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विदेशी माध्यमांची वर्चस्वता रोखायला हवी. स्वदेशी माध्यमांचे स्वातंत्र्य कायम ठेवून फेसबूकने ‘सनातन प्रभात’च्या पेजवर घातलेली बंदी त्वरित उठवायला हवी.
आता फेसबूकवरच भारत सरकारने बंदी आणावी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
‘टाइम’सारख्या विदेशी प्रसिद्धीमाध्यमाने अहवाल दिला, म्हणून फेसबूकने सनातन संस्था, सनातन प्रभात, सनातन शॉप, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांची फेसबूक पाने बंद केली आहेत. कोणतेही ठोस कारण नसतांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेप करून अशा प्रकारे निवडक पाने बंद केली जात असतील, तर फेसबूकवरच सरकारने बंदी आणावी, अशी आमची मागणी आहे.
फेसबूकचा मनमानी कारभार चालू देणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
१. हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, समाजसाहाय्य, हिंदु संस्कृतीचे जतन, आचारधर्म आणि धर्माचरण यांविषयीचे कार्य घटनात्मक मार्गाने करत आहेत; मात्र तरीही फेसबूकने समितीची ३५ पाने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली. याउलट रझा अकादमी, नक्षल समर्थक हे मानवजातीला नष्ट करण्याचे आणि भावना भडकावण्याचे कार्य करत आहेत, हे फेसबूकला आक्षेपार्ह वाटत नाही का ? तेथे राज्यघटनाविरोधी भाषा वापरलेली पाने आहेत. हिंदूंचा आवाज दाबण्याचे फेसबूकचे हे षड्यंत्र असून आम्ही त्यांचा मनमानी कारभार चालू देणार नाही. भारतियांच्या बोलण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर गदा येत असल्यास फेसबूकला वैध मार्गाने विरोध करण्यासह त्याला हद्दपार करण्याची आवश्यकता आहे.
२. डेटाचोरीच्या (माहिती चोरीच्या) प्रकरणी अमेरिकी न्यायालयात दंड भरून माफी मागणारे फेसबूकचे मार्क झुकेरबर्ग यांनी प्रथम लष्कर-ए-तोयबापासून अनेक आतंकवादी आणि नक्षलवादी यांची चालू असलेली फेसबूक खाती बंद करण्याचे धाडस दाखवावे. भारतात पैसे कमवण्यासाठी आलेली विदेशी आस्थापने आमच्या विचार-लेखन स्वातंत्र्यावर बंदी कशी आणू शकतात ?
३. फेसबूकने ‘सनातन’ शब्दाला काळ्या सूचीत घातले आहे. ‘सेक्युलर’ (निधर्मी) राजकीय लोक, विदेशी माध्यमे आणि आतंकवादी विचारसरणीचे लोक यांनी षड्यंत्र रचून सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला; मात्र ते शक्य न झाल्याने हे लोक सामाजिक माध्यमांतून हे करण्याचा प्रयत्न करत आहेत का ?
फेसबूकचा विरोध करण्याविषयी सुनील घनवट यांनी मांडलेली सूत्रे
|
जिज्ञासूंचे अभिप्राय१. गिरीश ढवळीकर : हा एक प्रकारचा धार्मिक आघात आणि हिंदुत्वासंदर्भात केलेला हस्तक्षेप आहे. अशा परिस्थितीमध्ये फेसबूक वापरणे कितपत योग्य आहे ? सर्व विदेशी वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमे ही हिंदुविरोधी आहेत. भारत सरकार या सर्वांच्या विरोधात कठोर कारवाई का करत नाही ? यासंदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन दबाव टाकायला हवा. नायजेरियासारखा छोटा देश माध्यमांच्या हस्तक्षेपावर कठोर कारवाई करू शकतो, तर आपण का नाही ? भारत सरकारने यावर त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. २. डॉ. राजेंद्र गावस्कर, सिंधुदुर्ग : फेसबूकविरोधी लाट जगभरातील सर्व अनिवासी भारतियांपर्यंत पोचली पाहिजे. यामुळे फेसबूकचा भगव्याविषयीचा आंधळेपणा दूर होईल. ३. अधिका वेणूगोपाळ : सर्वधर्मसमभाव हा कोरोना खालोखाल घातक विषाणू आहे. ४. संतोषकुमार व्ही. एन्. : भारतामध्ये फेसबूकवर बंदी घातली पाहिजे. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून फेसबूक विरोधात कठोर कारवाई करायला हवी. ५. डॉ. श्रेया सहा : फेसबूकच्या विरोधात कृती करण्यास सरकार अपयशी ठरत असेल, तर सर्व हिंदूंनी संघटित होऊन फेसबूकवर बहिष्कार घालायला हवा. |