नोकरीचे आमीष दाखवून ९ राज्यांतील तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
गुन्हेगारांना कायद्याचे भयच नसल्याचे हे उदाहरण !
हिंगोली – नोकरी लावण्याचे आमीष दाखवून सहस्रो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीतील ७ जणांना येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत पोलीस यांच्या संयुक्त पथकाने नांदेड, लखनऊ, देहली, मुंबई, ओडिशा येथून अटक केली आहे. आरोपींनी महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, देहली, पश्चिम बंगाल या ९ राज्यांसह इतर राज्यांतील सहस्रो तरुणांची गेल्या १० वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
नोकरी लावण्याचे खोटी आमीष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकारही या तरुणांनी केले आहेत. पोलिसांनी ७ आरोपींची विविध अधिकोषांतील खाती बंद केली असून या खात्यातील ११ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी ७ भ्रमणभाष संच आणि १ चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण भारतात असून अटक केलेल्या ७ जणांच्या अधिक चौकशीमध्ये आणखी आरोपी हाती लागण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.