औंध (जिल्हा सातारा) येथे पोलीस उपनिरीक्षकांचे पती लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
लाच स्वीकारल्यानंतर कडक कारवाई न झाल्याचा परिणाम ! पोलीस उपनिरीक्षकांचे पती लाच घेतांना अटक होतात तर त्यांचाही यामध्ये सहभाग असणार, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
सातारा, २२ जून (वार्ता.) – पोक्सो अंतर्गत गुन्ह्यातील जाचक कलमे शिथिल करण्यासाठी आरोपीकडे औंध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ लिपिक चंदन शिंदे यांनी १ लाख ५० सहस्र रुपयांची लाच मागितली. यातील ५० सहस्र रुपये याच पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांचे पती सुशांत सुरेश वरुडे यांच्या हस्ते स्वीकारली. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद आहे.
औंध (जिल्हा सातारा) पोलीस ठाण्यातील शिंदे यांनी दीड लाख रुपये लाच मागितली. त्यातील ५० सहस्र रुपये सुशांत वरुडे यांच्याकडे देण्याचे निश्चित झाले. याविषयी आरोपींचे भाऊ (तक्रारदार) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पडताळणी केल्यावर तथ्य आढळून आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरीत सापळा रचून वरिष्ठ लिपिक चंदन शिंदे यांच्या वतीने लाच स्वीकारतांना सुशांत वरुडे यांना पकडले.