तासगाव (जिल्हा सांगली) येथील सनातनचे साधक गजानन खेराडकर यांनी जागरूकतेने रोखला ‘पीपीई किट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा संसर्ग !

तासगाव-सांगली रस्त्यावर संतोष पेट्रोल पंपानजिक वापरून टाकलेले ‘पीपीई किट’ने भरलेले पोते

तासगाव, २२ जून (वार्ता.) – २१ जून या दिवशी सकाळी अज्ञातांनी तासगाव-सांगली रस्त्यावर संतोष पेट्रोल पंपानजिक वापरून झालेले ‘पीपीई किट’ने भरलेले पोते टाकले होते. परिसरातील एका भटक्या कुत्र्याने यातील एक ‘पीपीई किट’ पोते फाडून रस्त्यावर टाकले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही गोष्ट सनातनचे साधक श्री. गजानन खेराडकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याची छायाचित्र काढली, तसेच याचे ध्वनीचित्रीकरण करून ते स्थानिक वार्ताहरांच्या ‘व्हॉट्सॲप’च्या गटात टाकले. याची तात्काळ नोंद घेत काही ‘ऑनलाईन वेबपोर्टल’नी याचे वृत्त बनवले. या माध्यमातून हा प्रकार तासगाव नगरपालिकेपर्यंत पोचला आणि त्यांची गाडी येऊन हे पोते घेऊन गेले. अशा प्रकारे श्री. गजानन यांनी जागरूक राहून ‘पीपीई किट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा संसर्ग टाळला.

वास्तविक कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात वापरून झालेल्या ‘पीपीई किट’ची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे आवश्यक असते. यासाठी आरोग्ययंत्रणेची स्वतंत्र व्यवस्था असते, असे असतांना अशा प्रकारे वापरून झालेले ‘पीपीई किट’ रस्त्यावर टाकून देणे गंभीर असून असे ‘पीपीई किट’ टाकून देणार्‍यांचा शोध घेऊन संबंधितांना कठोर शासन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.