संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !

आईने रागावल्यानंतर मुलगा घर सोडून निघून गेला !

  • मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी पालकांनी त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे !

  • शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक मुलांवर कुसंस्कार होऊन ते वाईट गोष्टींच्या आहारी जातात. यासाठी पालकांनी स्वतःची मुले भ्रमणभाषवरील संकेतस्थळाचा वापर अभ्यासासाठी करतात कि नाही, हे आवर्जून पाहिले पाहिजे.   

संभाजीनगर – शहरातील पुंडलिकनगर येथे रहाणार्‍या आणि इयत्ता दहावीत शिकणार्‍या १६ वर्षीय एका मुलाला ‘ऑनलाईन’ शिकवणी वर्गाच्या कालावधीत संकेतस्थळावर ‘गेम’ खेळण्याचा नाद लागला. ९ मासांत या खेळावर त्याने आई- वडिलांच्या अधिकोष खात्यातील २८ सहस्र रुपये व्यय केले. हा प्रकार समजल्यानंतर आई रागावल्याने त्याने घरातून पलायन केले. पोलिसांनी २ दिवस शोध घेऊन त्याला सुखरूप परत आणून २ दिवस त्याचे समुपदेशनही केले. त्या मुलाला ‘ऑनलाईन’ अभ्यासाचा कंटाळा आला होता. त्यामुळे त्याने मित्राप्रमाणे ‘गेम’ खेळायला प्रारंभ केला. ‘आईचे पैसे व्यय केल्याची चूक त्याने मान्य केली आहे. परत अशी चूक कधी करणार नाही’, असे त्याने पोलिसांना सांगितले.

याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले, ‘‘दळणवळण बंदी’च्या काळात अनेक मुलांचे स्वभाव पालटले आहेत. ते टोकाचे पाऊल उचलत असल्याची अनेक उदाहरणे आमच्यापर्यंत आली आहेत; मात्र पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी भ्रमणभाषवर काय करतात ? ते अभ्यास कसा करतात ? इतर कोणत्या गोष्टी पहात असतात, हे आवर्जून पडताळले पाहिजे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा. महत्त्वाचे म्हणजे त्यांना समजून घेतले, तर अशा घटना टळू शकतील.’’