योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोव्यात ठिकठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ उत्साहात साजरा
पणजी, २१ जून (वार्ता.) – योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगामुळेच आपल्यापैकी लाखो लोकांना कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी साहाय्य झाले. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग हा अविभाज्य भाग बनवला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून केले. प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २१ जून या दिवशी सकाळी आग्वाद या ऐतिहासिक किल्ल्यावर झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनीही आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली. सदानंद शेट तनावडे यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना योगाचे महत्त्व प्रतिपादित केले. ‘आय्.एन्.एस्.हंसा’ या नौसेनेच्या तळावरही २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
जगातील १९३ देश आज योगाच्या बाजूने ! – खासदार श्रीपाद नाईक
योगाचे महत्त्व आज जगातील अनेक देशांना पटलेले आहे. आज जगातील १९३ देश योगाच्या बाजूने आहेत, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’च्या निमित्ताने प्रसारमाध्यमांना संरक्षण राज्यमंत्री तथा माजी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली.
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या काळात योगाचा जगाला पुष्कळ लाभ झाला. कोरोना महामारीच्या काळात ‘अॅलोपॅथी’ पद्धतीने आधार दिलाच; पण त्याचसमवेत योग, होमिओपॅथी आणि आयुर्वेदाची औषधे अन् उपचार यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ दिले. कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम आरोग्यावर होणे टाळण्यासाठी योगाचे सुरक्षाकवच आज प्राप्त झाले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग हा बिनखर्चाचा उपाय आहे. सगळी वैद्यकशास्त्रे ही मानवी आरोग्याच्या हितासाठीच आहे; मात्र प्रत्येक शास्त्राची औषधाची परिणामकारकता सिद्ध करण्याची पद्धत निराळी आहे. सहस्रो वर्षांपासून आयुर्वेद आणि योग भारतीय जीवनात आहे. विविध गावांमध्ये पिढीजात पद्धतीने वैद्य निरनिराळ्या व्याधींच्या रुग्णांना औषध देत असतात. आयुष मंत्रालयाकडून अशा वैद्यांकडून औषधनिर्मितीची पद्धत (फॉर्म्युला) गोळा करण्याचे काम चालू आहे.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरापर्यंतचे ‘योग’ अभ्यासक्रम सिद्ध करणार
देशातील प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद रुग्णालय उभारले जाणार आहे. संमत झालेल्या ११८ पैकी १०० आयुर्वेद रुग्णालयांचे बांधकाम चालू आहे. पुढील ३ वर्षांत ते पूर्ण होणार आहे. ‘आयुष’ मंत्रालय ३ मास ते ६ वर्षे कालावधीचे पदवी आणि पदव्युत्तर स्तरापर्यंतचे अभ्यासक्रम सिद्ध करत आहे. देशभरात १२ सहस्र ५०० ‘वेलनेस’ सेंटर उघडली जाणार आहेत. धारगळ येथील‘इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, योगा अँड नॅचरोपॅथी संस्था’ प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी लवकरच बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) चालू केली जाणार आहे. या रुग्णालयात पर्यटकही आयुर्वेदाच्या उपचारांचा लाभ घेऊ शकणार आहेत. या रुग्णालयात ६० जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असणार आहे. रायबंदर येथील जुन्या ‘गोमेकॉ’ इमारतीच्या खालच्या मजल्यावर आयुर्वेद संशोधन केंद्र आणि २० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय गोव्यात २० ‘वेलनेस सेंटर’ होणार आहेत. मडगाव येथील मोतीडोंगर येथे ५० खाटांचे, तसेच साखळी येथेही आयुष रुग्णालय होणार आहे.
कोरोनावरील आयुर्वेदाच्या उपचारांना शास्त्रीय प्रमाणीकरण मिळणार
कोरोनावरील आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीला शास्त्रीय प्रमाणीकरण मिळवण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. आयुर्वेद आणि पारंपरिक औषधोपचार यांना ‘आय्.सी.एम्.आर्.’ सारख्या संशोधन संस्थेकडून प्रमाणीकरण मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
डॉ. पंकज सायनेकर यांचा सूर्यनमस्कार घालण्यात विश्वविक्रम
डॉ. पंकज सायनेकर यांनी १८ घंटे ११ मिनिटांमध्ये ३ सहस्र ७३० सूर्यनमस्कार घालून नवीन विश्वविक्रम केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी विश्वविक्रम करणारे डॉ. पंकज सायनेकर यांचा सन्मान केला.