कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुणे येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ६ जणांना अटक आणि नंतर जामीनावर सुटका !
पुणे, २१ जून – येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे १९ जून या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अजित पवार यांनीही यावर नाराजी व्यक्त करत आयोजकांवर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर २१ जून या दिवशी प्रशांत जगताप यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.
गर्दीची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका झाली. अजित पवार एकीकडे लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन सातत्याने करत असतांना ही गर्दी झाल्यामुळे जोरदार टीका करण्यात आली होती.