मिरजेतील ‘वारकरी भवन’चे उदघाटन !
मिरज – महाराष्ट्रातील सहस्रो वारकरी पंढरपूरला जातात. पंढरपूर येथे जातांना या वारकर्यांना विश्रांतीसाठी मिरज-पंढरपूर रस्त्यावर कोणतेच विश्रांतीस्थान नव्हते. या वारकर्यांच्या विश्रांतीसाठी लागणार्या वारकरी भवनचे उद्घाटन नुकतेच भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज (अजरेकर फड प्रमुख, पंढरपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या भवनमुळे सहस्रो वारकर्यांची सोय होणार आहे.
आमदार श्री. सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे विविध विकास कामांसाठी सांगली महापालिकेस १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या निधीमधून मिरजेत पंढरपूर रस्त्यावर वारकरी भवन उभारण्याची मागणी वारकर्यांनी केली होती. त्यानुसार मान्यता देऊन हे भवन उभारण्यात आले. या वेळी भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, नगरसेविका अनिता व्हनखंडे, माजी नगरसेवक सुरेश आवटी, ह.भ.प. ज्ञानेश्वर पोतदार महाराज, ह.भ.प. अरुण पोरे यांसह अन्य उपस्थित होते.