‘साधकांची साधना आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !
‘कर्नाटक राज्यातील साधकांना साधनेची दिशा आणि साधनेतील योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी अनेक शिबिरे घेऊन साधकांना प्रोत्साहन दिले अन् ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी पुष्कळ तळमळीने प्रयत्न करून अनेक साधक घडवले. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून जाणवलेली त्यांची गुरुकार्याची तळमळ आणि त्यांच्यातील साधकांप्रती असलेला वात्सल्यभाव इत्यादी अनेक सूत्रे शिकता आली. ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी पू. रमानंदअण्णा यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांनी साधक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत. १९ जून २०२१ या दिवशी आपण ‘पू. रमानंदअण्णा यांनी ‘गुरुपौर्णिमेची सेवा चांगली व्हावी आणि त्यातून साधकांची साधना व्हावी’, यासाठी केलेले प्रयत्न’ याविषयीचे लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488146.html |
३. पू. रमानंद गौडा यांनी आयोजित केलेली विविध विषयांवरील शिबिरे
३ अ. जनसंपर्क शिबिर
३ अ १. ‘समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क करून धर्मकार्याला कसे जोडू शकतो ?’, हे सांगण्यासाठी शिबिराचे आयोजन करणे : ‘समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना सनातन संस्थेशी कसे जोडायचे ?’, हे सांगण्यासाठी आणि जनसंपर्क सेवेसाठी साधकांना सक्षम करण्यासाठी जनसंपर्क शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यात विज्ञापन सेवा परिणामकारक करणारे साधक तसेच उद्योगपती आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांना संपर्क करण्याची क्षमता अन् नेतृत्वगुण असणारे साधक यांना बोलावून त्यांचे २ दिवसांचे शिबिर घेण्यात आले.
३ अ २. या उपक्रमांच्या माध्यमातून व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणे : ‘आपली साधना उत्तम झाली, तर त्याचा समष्टीवर कसा परिणाम होतो ? समष्टीत जातांना आपण आदर्श कसा ठेवायचा ? आपण सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांचे प्रतिनिधी असल्याची जाणीव आपल्याला सतत कशी असायला हवी ?’, याविषयी सर्वांना सांगण्यात आले. शेवटी पू. अण्णांनी या उपक्रमांच्या माध्यमातून ‘आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धी कशी करायची ? अन् आपली साधना चांगली होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी सांगितले.
३ अ ३. पू. अण्णांनी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे : या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘साधक साधनेत कुठे न्यून पडतो ?’, याविषयी गटचर्चा घेण्यात आली. त्यानंतर पू. अण्णांनी स्वतः सर्वांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. त्यामुळे सर्व साधकांना ‘आपण साधनेत न्यून पडत आहोत’, याची जाणीव होऊन त्यांची अंतर्मुखता वाढली. याची फलनिष्पती म्हणून प्रत्येक आठवड्याला आढावा सत्संग चालू झाला. त्यामुळे साधकांची व्यष्टी साधना व्यवस्थित व्हायला लागली. त्यामुळे समष्टी सेवेचे नियोजनही योग्य पद्धतीने चालू झाले.
३ अ ४. फलनिष्पत्ती – पू. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्याने ४ कन्नड ग्रंथांची विज्ञापने १० दिवसांत पूर्ण होणे आणि अधिक विशेषांक काढता येणे : विज्ञापनांची जनसंपर्क सेवा करणार्या साधकांमध्ये साधनेच्या स्तरावर पालट झाला. त्यांनी प्रत्येक आठवड्याला एक या पद्धतीने वेगवेगळे ध्येय ठेवले, उदा. एका आठवड्यात ग्रंथासाठी विज्ञापने आणणे, दुसर्या आठवड्यात विशेषांकासाठी विज्ञापने घेणे, नंतर ग्रंथालयांना संपर्क करणे इत्यादी. अशा प्रकारे ध्येय ठेवून प्रयत्न केल्यामुळे ४ कन्नड ग्रंथांची विज्ञापने केवळ १० दिवसांत पूर्ण झाली आणि ४ – ५ रंगीत विशेषांक अधिक काढता आले.
आता सर्व जिल्ह्यांत जनसंपर्क सेवक नेतृत्व घेऊन आणि संपर्कासाठीची सूची बनवून प्रयत्न करत आहेत. प्रत्येक आठवड्यात होणार्या त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या सत्संगामध्ये पू. अण्णा स्वतः उपस्थित रहात होते. त्या सत्संगातून साधकांना योग्य दृष्टीकोन देतांना ‘ते कुठे न्यून पडले ?’, हे सांगून त्यांना पुढील सेवेसाठी प्रोत्साहन देत होते. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटला आणि सेवा अन् साधना करण्याचा त्यांचा उत्साह वाढला.
३ आ. साधकत्व आणि गुरुकार्यवृद्धी शिबिर
३ आ १. व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प करणार्या साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन त्यांना व्यष्टी साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे : जनसंपर्क शिबिर झाल्यानंतर कर्नाटक राज्यातील साधकांसाठी साधकत्व आणि गुरुकार्यवृद्धी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. असे शिबिर राज्यात ३ ठिकाणी घेण्यात आले. यांतील प्रथम शिबिरात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. ५ दिवसांच्या या शिबिरात ‘साधक व्यष्टी साधनेत कुठे न्यून पडतो ?’, याविषयी साधकांची व्यष्टी साधनेविषयी गटचर्चा ठेवली होती. ज्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प आहेत, त्यांचा स्वतः पू. अण्णांनी आढावा घेतला. पू. अण्णांनी बाकी साधकांचाही व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन त्यांना अंतर्मुख केले आणि त्यांचे समष्टी कार्य चांगले होण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन करण्यात आले.
३ आ २. साधकांचे गुणकौशल्य ओळखून त्यांना सेवेचे दायित्व देण्याविषयी प्रायोगिक भाग घेणे : शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना ‘साधकाला पाहून, त्याचे बोलणे ऐकून किंवा इतरांनी त्याच्याविषयी सांगितलेले ऐकून त्या साधकामधील क्षमता आणि कौशल्य कसे ओळखू शकतो ?’, हे प्रायोगिक भागात शिकवण्यात आले.
अ. एका साधकाला समोर बोलावून अन्य साधकांना त्याचे निरीक्षण करण्यास सांगितले आणि ‘ते कोणते दायित्व घेऊ शकतात ?’, याचा अभ्यास सांगण्यास सांगितला.
आ. त्यानंतर तो साधक ज्या जिल्ह्यातून आला आहे, त्या जिल्ह्यातील साधकांना त्या साधकाविषयीचा त्यांचा अभ्यास सांगण्यास सांगितले.
इ. साधकांनी त्यांचे निरीक्षण सांगितल्यावर पू. अण्णांनी ‘त्यांच्यातील भाव कसा आहे ? त्यांच्यात कोणते गुण आहेत ? त्यांच्यात कोणते कौशल्य आहे ? त्यांची क्षमता काय आहे ? त्यांचा नेतृत्वगुण कसा आहे ?’, असा सर्व अभ्यास करून सांगितले.
ई. या वेळी साधकांकडून साधकाचा अभ्यास करतांना केवळ एकाच बाजूने, म्हणजे स्वभावदोषांच्या दृष्टीने विचार केला जात होता; पण पू. अण्णांनी त्यांच्या स्वभावदोषांच्या समवेतच ‘त्यांचे गुण कोणते आहेत ? त्यांचे कौशल्य आणि क्षमता काय आहे ? ‘त्यांची अडचण समजून घेऊन त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी काय साहाय्य करायला हवे ?’, याचा अभ्यास कसा करायचा ?’, हे यातून शिकवले.
३ आ ३. साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे ध्येय ठेवून प्रयत्न करायचे ठरवणे : सर्व साधकांना ध्येय ठेवून प्रयत्न करण्याचे महत्त्व सांगितल्यावर सर्व साधकांनी ३ मासांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे ध्येय ठरवले अन् समयमर्यादा ठेवून प्रयत्न करायचे ठरवले. या शिबिरामुळे ‘आपल्याला साधनेत पुनर्जन्मच मिळाला आहे’, असा कृतज्ञताभाव सर्व साधकांमध्ये जागृत झाला.
३ इ. या प्रकारची इतर ठिकाणी घेतलेली २ शिबिरे
३ इ १. स्वभावदोषांमुळे ज्या साधकांच्या साधनेची हानी झाली, त्या साधकांना शिबिरासाठी बोलावणे : याच प्रकारच्या दुसर्या आणि तिसर्या शिबिरात ‘आम्ही काहीतरी करत आहोत’, अशी अल्पसंतुष्टता असणे, मनमोकळेपणा नसणे, कर्तेपणा’, हे स्वभावदोष असणारे आणि ज्यांची अयोग्य मानसिकता आहे, अशा साधकांना बोलावले होते. मागील वर्षी यांतील काही साधकांची आध्यात्मिक पातळीही न्यून झाली होती, तर काही साधकांची आहे, तेवढीच राहिली होती.
३ इ २. सर्व शिबिरार्थींसाठी शिबिरात प्रतिदिन १ घंटा संतांचे नामजपादी उपाय ठेवले होते.
३ इ ३. ‘साधकांच्या मनातील अयोग्य विचार जावेत’, यासाठी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात साधकांना स्वतःचे अयोग्य विचार लक्षात येणे आणि त्यांची अंतर्मुखता वाढून त्यांनी पुन्हा दायित्व घेऊन सेवा करण्यास सिद्ध होणे : ‘साधकांच्या मनात कोणते अयोग्य विचार आहेत ?’, हे लक्षात घेऊन ‘ते अयोग्य विचार जावेत’, यासाठी त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यावर ‘त्यांच्या मनातील अयोग्य विचार कोणते आहेत ?’, हे कळले. त्यानंतर पू. अण्णांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यात सर्वांनी मोकळेपणाने त्यांचे विचार सांगितले. यातून सर्वांना ‘स्वत: कुठे न्यून पडत आहोत ? स्वत:च्या मनातील कुठल्या विचारांमुळे आपण साधनेच्या एकाच टप्प्यावर अडकलो आहोत ?’, हे लक्षात आले. सर्व जण अंतर्मुख झाले. ‘इतकी वर्षे आपण आपल्या मनामध्ये असे विचार ठेवून स्वतःची किती हानी करून घेतली ?’, असे वाटून सर्वांना पश्चात्तापही झाला. आता मनमोकळेपणाने बोलल्यामुळे साधकांची मने मोकळी झाली. शिबिराला येण्यापूर्वी साधकांच्या मनात जे नकारात्मक विचार होते, ते सर्व दूर होऊन साधक नेतृत्व आणि दायित्व घेऊन सेवा करण्यास सिद्ध झाले.
३ इ ४. फलनिष्पत्ती
अ. शिबिरात आलेल्या शिबिरार्थींसाठी पू. अण्णांनी वैयक्तिक वेळ दिला. ते सर्व शिबिरार्थींशी प्रेमाने बोलले. त्यामुळे सर्वांना त्यांचा पुष्कळ आधार वाटला. याचाच परिणाम म्हणून सर्व साधक नेतृत्व घेऊन सेवा करण्यासाठी सिद्ध झाले.
आ. या ३ शिबिरांची फलनिष्पत्ती, म्हणजे साधकांनी ‘त्यांना कुठलीही सेवा दिली, तरी ते ती सेवा करण्यासाठी सिद्ध आहेत’, असे सांगितले. नवीन दायित्वाच्या सेवा करण्यासाठी काही साधक सिद्ध झाले. बाकीचे साधक स्थानिक पातळीवरील सेवा करण्यासाठी सिद्ध झाले आहेत आणि त्यांनी त्याप्रमाणे सेवाही चालू केली आहे. शिबिरात आलेल्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक साधकांमध्ये पालट दिसत आहे. सर्वांनी योग्य दृष्टीकोन आणि दिशा ठेवून प्रयत्न केले.
इ. एका साधिकेने ४ मासांत साधनेचे चांगले प्रयत्न करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीही गाठली.
३ इ ५. पू. अण्णांची साधकांविषयीची निरपेक्ष प्रीती आणि वात्सल्यभाव !
३ इ ५ अ. पू. अण्णांनी पूर्णवेळ साधना करणार्या साधकांना त्यांच्या साधनेतील अडचणी प्रेमाने विचारून त्यांवर उपाय सांगणे आणि पू. अण्णांमधील या वात्सल्यभावाने साधकांच्या मनात कुटुंबभावना निर्माण होऊन सर्वांची भावजागृती होणे : पहिल्या शिबिरात बरेच साधक पूर्णवेळ साधना करणारे होते. शिबिर झाल्यानंतर पूर्णवेळ साधना करणार्या सर्व साधकांच्या समवेत पू. अण्णांनी एक अनौपचारिक सत्संग घेतला. या सत्संगात त्यांनी ‘साधकांना प्रसारात काय अडचणी येतात ? प्रसारासाठी बाहेर गेल्यावर भोजन किंवा निवास यांमध्ये काही अडचण येते का ? सर्वांकडे बॅग, कपडे, चप्पल, छत्री, टोपी इत्यादी आवश्यक वस्तू आहेत ना ? सर्वांचे भ्रमणभाष चांगले आहेत ना ? साधकांना शारीरिकदृष्ट्या काही अडचण आहे का ?’, अशी सर्व आत्यंतिक प्रेमाने विचारपूस केली. पू. अण्णांमधील या वात्सल्यभावामुळे साधकांनी त्यांना येणार्या अडचणी अगदी मनमोकळेपणाने सांगितल्या. पू. अण्णांनी ‘त्यावर काय उपाय काढायचा ?’, हे सांगितले. पू. अण्णांच्या या प्रीतीमय बोलण्यामुळे सत्संगात सर्वांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होऊन सर्वांचीच भावजागृती झाली.’
३ ई. साधना शिबिर : पहिल्या राज्यस्तरीय शिबिरातून मिळालेल्या प्रेरणेतून दायित्व घेऊन सेवा करणार्या साधकांना एकत्र करून सर्व ठिकाणी साधना शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ‘साधकांना साधना आणि सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या सेवेतील अडचणी विचारणे, ‘त्यांना काय साहाय्य हवे आहे ?’, हे विचारणे, ‘ते कुठे न्यून पडत आहेत ? त्यांनी साधनेत पुढे जाण्यासाठी काय करायला हवे ?’, असे सर्व विषय घेतले. त्यामुळे सर्व साधक नेतृत्व घेऊन सेवा करण्यासाठी सिद्ध झाले. सर्वांनी समष्टी स्तरावर ध्येय ठेवून प्रयत्न केले. आता पुष्कळ नवीन साधक दायित्व घेऊन सेवा करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. जसजसे एक-एक शिबिर होईल, तसतशी साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची अन् सेवेची फलनिष्पत्ती वाढू लागली आहे.
३ उ. राज्यस्तरीय युवा साधना शिबिर
३ उ १. मंगळुरू सेवाकेंद्रातील चैतन्यामुळे शिबिरातील युवा साधकांमध्ये पुष्कळ पालट होऊन त्यांना साधनेचे महत्त्व पटणे : कर्नाटक राज्यातील जिल्ह्यांमधून १५ ते २५ वर्षे वयोगटातील युवा साधक या शिबिरात सहभागी झाले होते. मंगळुरू सेवाकेंद्रातील चैतन्य आणि संतांचे नामजपादी उपाय यांमुळे सर्वांनाच चांगले वाटत होते. सेवाकेंद्रातील चैतन्यामुळे त्यांच्यात पुष्कळ पालट झाला. शिबिरात ‘आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व’ सांगितल्यावर सर्वांना ते आवडले आणि त्यांचा उत्साह वाढला.
३ उ २. फलनिष्पत्ती
अ. केवळ ३ दिवसांच्या शिबिरात सर्वांच्या मनःस्थितीत पालट झाला होता. त्या सर्वांनाच शिबिरामुळे स्वतःमध्ये पालट झाल्याचे जाणवतही होते. पू. अण्णांनी सर्व युवा शिबिरार्थींशी वैयक्तिक बोलण्यासाठी वेळ दिला. त्यामुळे सर्व शिबिरार्थींच्या मनाची स्थिती पूर्णपणे पालटली. ‘जीवनात प्राधान्याने साधना केली पाहिजे’, असे त्या वेळी सर्वांनी सांगितले. शिबिरामुळे सर्वांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली.
आ. सर्वांनी पू. अण्णांशी बोलतांना ‘किती वेळ बोललो ? कसा वेळ गेला ?’, हे कळलेच नाही’, असे सांगितले.
इ. काही जण संरचना (Dtp) शिबिरासाठी आले आणि त्यांनी पुढील सेवेचे दायित्वही घेतले. काही साधकांनी ‘सोशल मिडिया’ची सेवा चालू केली.
ई. ‘घरातून नातेवाइकांचा विरोध आहे. त्यामुळे पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा असूनही करता येत नाही’, असे काही जणांनी सांगितले. ते सांगतांना त्यांना रडू अनावर होत होते. एक साधिका तिच्या वडिलांना घेऊन आली आणि त्यांच्यासमोरच तिने ‘पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा आहे’, असे सांगितले.
३ ऊ. वितरक साधना शिबिर
३ ऊ १. व्यावहारिक दृष्टीने वितरण न करता ‘साधनेच्या दृष्टीने वितरक साधकांनी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी योग्य दिशा देण्यासाठी शिबिर आयोजित करणे : वितरक म्हणून सेवा करणार्या साधकांमध्ये व्यावहारिक विचार निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचे साधनेचे प्रयत्न न्यून झाले होते. त्या सर्वांना ‘सनातन संस्थेच्या कार्यपद्धतीचे पालन केल्याने साधना कशी होईल ? आपण कुठे न्यून पडतो ? अजून काय करता येईल ? वितरणाच्या सेवेतून साधनाच व्हायला हवी’, अशी दिशा देण्यासाठी वितरक साधना शिबिराचे आयोजन केले.
३ ऊ २. वितरकांच्या अडचणी विचारून त्यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगणे : या शिबिरात सहभागी झालेल्या वितरकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन त्यांना पू. अण्णांनी मार्गदर्शन केले. ‘जिल्ह्यात त्यांच्याकडून कोणत्या चुका होत आहेत ? कोणती अडचण येत आहे ? मुख्य कार्यालयाकडून कोणती अडचण येत आहे ? मुख्य कार्यालयाला जिल्ह्यातील वितरकांकडून काय अडचण येते ?’, याविषयी पू. अण्णांनी वितरकांना विचारले आणि ‘आपण अजून काय चांगले करू शकतो ?’, याविषयीही त्यांच्याकडून जाणून घेतले.
या शिबिरात पू. अण्णांनी ‘वितरकाची सेवा साधना म्हणून कशी करायची ? स्वतःतील स्वभावदोष आणि अहं कसे न्यून करायचे ? आपण या सेवेतूनही कसे समर्पित होऊ शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले.
३ ऊ ३. फलनिष्पत्ती
अ. ‘आपण कुठे न्यून पडतो ?’ याची वितरकांना जाणीव झाली. सर्व जणांनी ‘ही वितरणाची सेवा साधना म्हणून करून गुरुकार्यात सहभागी रहाण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.
आ. प्रथम काही वितरक समष्टी सेवेसाठी वेळ देत नव्हते. आता त्यांतील काही जण सेवेसाठी वेळ देण्यास सिद्ध झाले.
इ. या सर्वांचा व्यष्टी साधनेच्या आढाव्याचा गट बनवला आहे आणि त्या गटात त्यांनी आढावा देणे चालू केले आहे.
३ ए. विज्ञापन संरचना शिबिर
३ ए १. संरचना करण्यासाठी सक्षम गट बनवण्यासाठी शिबिराचे आयोजन करणे : कर्नाटक राज्यात विज्ञापनांची संरचना करणारे साधक अल्प होते आणि संरचना करणारे जे साधक होते, त्यांना पुढील टप्प्यांची माहिती नव्हती. संरचना करण्यासाठी सक्षम गट बनवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्राथमिक, माध्यमिक आणि अंतिम संरचना करू शकणार्या साधकांचे ३ गट बनवले आणि त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना शिकवण्यासाठी मुख्य कार्यालयातून संरचना करणार्या एका साधकाला बोलावले होते.
३ ए २. साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन ‘सेवा करतांना साधनेच्या दृष्टीने कोणते प्रयत्न करायचे ?’, हे सांगणे : या समवेत संरचना शिकण्यासाठी आलेल्या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. त्यांना ‘ही सेवा साधना म्हणून कशी करायची ? भाव कसा ठेवायचा ? चुका कशा न्यून करायच्या ? साधनेच्या दृष्टीने कोणते प्रयत्न करायचे ?’, हे सांगितले. त्यामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळाले आणि सर्वांचे गांभीर्य वाढले.
३ ए ३. फलनिष्पत्ती
अ. ३ साधक या सेवेत सक्षम झाले आहेत आणि ते दुसर्यांना शिकवण्यासाठीही सिद्ध झाले आहेत.
आ. आता विज्ञापनांची संरचना करणार्या साधकांचा प्रत्येक आठवड्याला सत्संग होत आहे. त्यांचे गांभीर्य वाढले असून साधनेचे चांगले प्रयत्नही चालू झाले आहेत.
४. केवळ शिबिरे घेऊन न थांबता वेळोवेळी सर्व साधकांचा आढावा पाहून त्यांना मार्गदर्शन करणे
साधकांचा कार्य आढावा, व्यष्टी साधनेचा आढावा आणि समष्टी सेवेत होणार्या चुका ठेवण्यासाठी एक धारिका बनवली आहे. त्यामध्ये बरेच साधक प्रतिदिन त्यांच्याकडून झालेल्या चुका आणि त्यांचा साधनेचा आढावा ठेवत आहेत. या धारिका पू. अण्णा प्रतिदिन पडताळतात आणि ‘साधक कुठे न्यून पडतात ? अजून काय करायला हवे ?’ असा अभ्यास करून साधकांना त्याची जाणीव करून देतात, तसेच जे साधक व्यष्टी साधनेचा आढावा ठेवत नाहीत, त्या साधकांना त्याची जाणीव करून देतात.’
– श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक. (एप्रिल २०२०)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488906.html |