गोव्यात शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिघात ‘कोटपा’ कायद्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी ८८५ दुकाने
तंबाखू नियंत्रण कायद्याचे कठोरतेने पालन करण्याची पालक आणि ‘सिव्हील सोसायटी’ यांची मागणी
पणजी, २० जून (वार्ता.) – गोव्यात शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्ड परिघात सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ (COTPA – ‘कोटपा’) कायद्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी ८८५ दुकाने आहेत. ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर टॉबेको इरॅडिकेशन’ (नोट) आणि देहलीस्थित ‘कंझ्यूमर वॉइस्’ यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. ‘इंटरनॅशनल फादर्स डे’च्या निमित्ताने ‘नोट’ आणि ‘कंझ्यूमर वॉइस्’ या संघटनांनी गोव्यात तंबाखू नियंत्रण कायद्याचे कठोरतेने पालन करण्याची मागणी गोवा सरकारकडे केली आहे.
‘कंझ्यूमर वॉइस्’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीम संन्याल म्हणाले, ‘‘गोव्यात शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिघात ‘कोटपा’ कायद्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी ८८५ दुकाने असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. या दुकानातून विडी आणि सिगारेट यांची विक्री केली जाते. हे पदार्थ लहान मुलांना अल्प दरात आणि सहजतेने उपलब्ध असतात. याकडे युवा पिढी प्रामुख्याने आकर्षित होते. संबंधित नगरपालिकांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि विज्ञापन करण्याला आळा घातला पाहिजे.’’
‘नोट’चे डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘तंबाखूमुळे देशातील आरोग्य आणि आर्थिक स्तरांवर मोठा ताण पडत आहे. तंबाखूमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे आवश्यक आहे.’’
भारतात २६ कोटी ८० लक्ष लोक तंबाखूचा वापर करतात आणि तंबाखूचा वापर करण्याच्या सूचीत भारत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. तंबाखूशी निगडित आजारामुळे देशात प्रतिवर्षी १३ लक्ष लोक मृत्यू पावत आहेत. देशात कर्करोगाची २७ टक्के प्रकरणे ही तंबाखूच्या सेवनाशी निगडित आहेत.