आंध्रप्रदेशमधील आमदार आणि स्थानिक धर्मांध यांचा क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा घाट !
प्रतिमा लावण्यास विरोध करणार्या भाजपच्या नेत्यांना अटक
|
भाग्यनगर – आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यात असलेल्या प्रोद्दुतुर येथे सत्ताधारी वायएस्आर् (युवाजना श्रमिका रीथु) काँग्रेसचे आमदार आर्. शिवप्रसाद रेड्डी, तसेच स्थानिक धर्मांध यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची प्रतिमा लावण्याचा घाट घातला आहे. हे समजताच यास राज्यातील भाजपचे महासचिव विष्णुवर्धन रेड्डी यांनी विरोध केल्याने त्यांना, तसेच भाजपच्या अनेक नेत्यांना १८ जून या दिवशी पोलिसांनी अटक केली. भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा आंध्रप्रदेश राज्याचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून ही माहिती दिली.
Andhra unit of BJP opposes the idea of setting up a statue of Tipu Sultan#Video https://t.co/AmvPT9cecq
— IndiaToday (@IndiaToday) June 20, 2021
आमदार आर्. शिवप्रसाद रेड्डी यांनी टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळताच भाजपच्या नेत्यांनी ती न लावण्याविषयी चेतावणी दिली. तथापि प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने राज्यातील भाजपचे महासचिव विष्णुवर्धन रेड्डी, भाजपचे कडप्पा जिल्हाध्यक्ष येल्ला रेड्डी, माजी जिल्हाध्यक्ष अंकल रेड्डी, भाजपच्या ‘किसान मोर्चा’चे अध्यक्ष शशिभूषण रेड्डी आदी नेते जेथे प्रतिमा लावण्यात येणार होती, त्या ठिकाणी पोचले. त्यांनी ‘आमदार आर्. शिवप्रसाद रेड्डी हे येथे जाणूनबुजून टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याच्या माध्यमातून धर्मांधांचे लांगूलचालन करत आहेत’, असा आरोप केला. यावर पोलिसांनी भाजपच्या या सर्व नेत्यांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले.
या प्रकरणी भाजपचे नेते सुनील देवधर यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा निषेध केला आहे. त्यांनी ‘सहस्रो हिंदूंची हत्या करणार्या आणि शेकडो मंदिरे नष्ट करणार्या टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यास विरोध केल्यामुळेच भाजपच्या नेत्यांना अटक करण्यात आली’, असा आरोप केला.
टिपू सुलतानची प्रतिमा लावल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील ! – भाजपचे आंध्रप्रदेश प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू
आंध्रप्रदेशमधील भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू म्हणाले की, टिपू सुलतानची प्रतिमा लावल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. यासह आमच्या भागात तणावही निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील.