एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !
-
माहिती अधिकारातून एन्.सी.ई.आर.टी.चा खोटेपणा पुन्हा उघड !
-
‘महिला जर शिकल्या, तर त्या विधवा होतील’, असे भारतात म्हटले जात असल्याचा दावा !
केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या अखत्यारीत असणार्या एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या) पुस्तकामध्ये सतीप्रथा केव्हापासून चालू झाली, याचा इतिहास देण्यात आला आहे. याविषयीचे पुरावे मागण्याचा प्रयत्न माहिती अधिकाराच्या अंतर्गत करण्यात आला असता एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘आमच्याकडे पुरावे नाहीत’, असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक पांडेय यांनी माहिती अधिकारांतर्गत याविषयी माहिती विचारली होती.
१. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ८ वीच्या ‘वुमन : कास्ट अँड रिफॉर्म्स’ या धड्यामध्ये सतीप्रथेविषयी माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, भारताच्या काही भागांमध्ये ज्या विधवा आपल्या पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेमध्ये स्वतःला अर्पण करून प्राणत्याग करत, त्यांचे कौतुक केले जायचे. विधवांच्या संपत्तीच्या अधिकारावरही बंदी होती. महिलांना शिक्षणही मिळत नव्हते. देशातील काही भागांमध्ये असे मानले जात होते की, महिला जर शिकल्या, तर त्या विधवा होतील. (अशा प्रकारे जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मशास्त्रात नसलेल्या प्रथेविषयी चुकीची माहिती पसरवून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचाच हा प्रयत्न आहे. याला हिंदुत्वनिष्ठ आणि धार्मिक संस्था यांनी वैध मार्गाने विरोध करून ही माहिती हटवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)
एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातील यापूर्वीचे आक्षेपार्ह धडे आणि मजकूर !
१. एन्.सी.ई.आर्.टी.च्या १२ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगल बादशाह औरंगजेब याने युद्धाच्या काळात हानी झालेल्या हिंदूंच्या मंदिरांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक तरतूद केल्याचे म्हटले होते. याविषयी एन्.सी.ई.आर.टी.कडे पुरावे मागण्यात आले असता ती देऊ शकली नव्हती.
२. कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश यांनी देहलीतील कुतुबमिनार बांधल्याचे एन्.सी.ई.आर.टी.च्या पुस्तकात म्हटले आहे. याविषयीही पुरावे मागितले असता एन्.सी.ई.आर्.टी. तेही देऊ शकली नव्हती.
३. पहिलीच्या पुस्तकात ‘आम की टोकरी’ नावाची कविता आहे. ‘ही कविता द्विअर्थी असून त्यातून अश्लील अर्थ निघतो’, असे सांगत सामाजिक माध्यमांतून यावर टीका करण्यात आली होती. तसेच ती पुस्तकातून काढण्याची मागणीही करण्यात आली होती.
४. एन्.सी.ई.आर्.टी.च्या वर्ष २००७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या ‘द लिटिल बुली’ या धड्यामध्ये एका मुलाचे नाव ‘हरि’ ठेवण्यात आले आहे. तो मुलींना चिडवतो, त्यांच्यावर वचक निर्माण करतो आणि त्यांची छेड काढतो. त्यामुळे त्याला सगळे घाबरतात आणि त्याचा द्वेष करतात. शेवटी एक खेकडा त्याला चावतो आणि धडा शिकवतो, असे लिहिण्यात आले आहे. यातून भगवान विष्णु यांच्या नावाला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.