हिंदु जनजागृती समितीच्या एका ऑनलाईन कार्यक्रमानंतर त्यातील सहभागी वक्त्यांची गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांकडून चौकशी !
अशी चौकशी कधी धर्मांधांच्या कार्यक्रमांची केली जाते का ?
‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका राज्यातील एक हिंदुत्वनिष्ठ आणि अन्य एका राज्यातील हिंदु जनजागृती समितीचे एक कार्यकर्ते हे वक्ते म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी या दोन्ही वक्त्यांना गुप्तचर विभागातील अधिकार्यांचा भ्रमणभाष आला होता. त्या वेळी त्यांच्यात झालेले संभाषण येथे देत आहोत.
१. गुप्तचर विभागातील अधिकारी आणि चर्चासत्रात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ वक्ते यांच्यात पुढील संवाद झाला.
अधिकारी : तुम्ही कार्यक्रमातून दोन धर्मांत विद्वेष का पसरवता ?
हिंदुत्वनिष्ठ : शासनाने जे केले ते मी जनतेसमोर मांडले. मी वस्तूस्थिती मांडली. माझे वक्तव्य चुकीचे नाही.
अधिकारी : या ठिकाणी तुम्ही हिंदु जनजागृती समितीच्या कोणत्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आहात ?
हिंदुत्वनिष्ठ : मी येथे समितीच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या संपर्कात नाही. या कार्यक्रमात मी जे बोललो, ते सामाजिक माध्यमांवर उपलब्ध असून त्यामध्ये आक्षेपार्ह असे काही नाही. मी तुम्हाला प्रसिद्धपत्रक पाठवतो.
त्यानंतर ते अधिकारी काहीही बोलले नाहीत.
२. गुप्तचर विभागातील अधिकारी आणि चर्चासत्रात वक्ते म्हणून सहभागी झालेले हिंदु जनजागृती समितीचे एक कार्यकर्ते यांच्यात पुढील संवाद झाला.
अधिकारी : तुम्ही कुठे आहात ? सध्या काय करता ?
कार्यकर्ता : कौटुंबिक कामासाठी घरी आलो आहे.
अधिकारी : मी हिंदु जनजागृती समितीचे ऑनलाईन कार्यक्रम पहात असतो. तुम्ही कोरोना या विषयावरून थेट ‘तिसर्या महायुद्धा’कडे कसे वळलात ?
कार्यकर्ता : सध्याची एकूण परिस्थिती पहाता तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. याविषयी अनेक भविष्यवेत्ते आणि द्रष्टे संत यांनीही सांगितलेले आहे. विदेशांमध्ये नागरिकांना प्रथमोपचार प्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाते. भारतात तशी व्यवस्था नाही. अशा वेळी महापूर, कोरोनासारखी महामारी आली, तसेच महायुद्ध झाले, तर नागरिकांनी काळजी कशी घ्यावी ? स्वतःचे रक्षण कसे करावे ? हे अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून सांगितले जाते आणि नागरिकांचे प्रबोधन केले जाते.
कार्यकर्त्याचे हे उत्तर ऐकल्यानंतर ते अधिकारी पुढे काहीही बोलले नाहीत.’