सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने उघड केला प्रशासनाचा निकृष्ट कारभार !
|
सावंतवाडी – तालुक्यात नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रोणापाल, खुटवळ येथे तिलारी धरणाच्या कालव्याची भिंत कोसळून माती आणि पाणी शिरल्याने येथील भातशेतीची मोठी हानी झाली आहे.
राणापाल येथील शेतकरी योगेश केणी यांची शेती या पाण्यात वाहून गेली. दुधाळ जनावरांसाठी लावण्यात आलेले गवत पूर्णपणे नष्ट झाले आहे. याला सर्वस्वी तिलारी धरणाच्या कालव्याचे झालेले निकृष्ट बांधकाम कारणीभूत असल्याचा आरोप केणी यांनी केला.
तिलारी कालवा विभागाच्या अधिकार्यांनी २ दिवसांत येऊन प्रत्यक्ष पहाणी करून झालेली हानीभरपाई न दिल्यास गायी-म्हैशी यांना घेऊन तिलारी कालवा विभागाच्या कार्यालयात येणार असल्याची चेतावणी केणी यांनी दिली आहे.
याविषयी निगुडे गावचे उपसरपंच गुरुदास गवंडे म्हणाले की, सर्वसामान्य गोरगरीब शेतकर्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचे काम नेहमी तिलारी धरण जलसंपदा विभाग करत आहे. योग्य नियोजनाच्या अभावी शेतकर्यांच्या भातशेतीमध्ये कालव्याची माती घुसून मोठी हानी होत आहे. निगुडे, रोणापाल, पाडलोस या गावांमध्ये झालेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून याला सर्वस्वी अधिकारीच उत्तरदायी आहेत.
मळगाव घाटीत बांधण्यात येत असलेली संरक्षक भिंत कोसळली
हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचारी कारभार समजायचा का ?
सावंतवाडी – सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव घाटीतील संरक्षक भिंत ८ दिवसांपूर्वी कोसळली होती. ही भिंत पाया न रचताच भर पावसात बांधण्याचा प्रयत्न केल्यामुळे उभी रहाण्यापूर्वीच कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या अवशेषांवर प्लास्टिक टाकून ते झाकण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराने केला असला, तरी या प्रकारामुळे कामातील भ्रष्टाचारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी केला आहे.
मळगाव घाटीतील संरक्षक भिंत कमकुवत झाली असून त्याची दुरुस्ती करावी अथवा नवीन बांधकाम करावे, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर पहिल्याच पावसात एका मोरीची संरक्षक भिंत कोसळली होती. (मागणी करूनही संरक्षक भिंतीची दुरुस्ती न करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग काय कामाचा ? जनतेला कळते तेही विभागातील अभियंत्यांना कळत नाही कि ते निष्क्रीयच आहेत ? – संपादक) सद्य:स्थितीत या भागातील अर्धा रस्ता खचला असून भिंतीचे बांधकाम पूर्ण न झाल्यास संपूर्ण रस्ताच बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भिंतीचे काम ठेकेदाराने पुन्हा चालू केले असून आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष उभे राहून योग्य प्रकारे काम करून घ्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.