‘मराठी राजभाषा समिती’ची मागणी
सरकारने मराठी राजभाषा करण्यासाठी अध्यादेश काढावा !
पणजी, १८ जून (वार्ता.) – केंद्रशासनाने अध्यादेश काढून काश्मीरचे कलम ३७० रहित केले. याच धर्तीवर राज्य सरकारने मराठीला गोमंतकाची राजभाषा करण्यासाठी अध्यादेश काढावा, अशी मागणी ‘मराठी राजभाषा समिती’चे गो.रा.ढवळीकर यांनी क्रांतीदिनी येथील आझाद मैदानात केली. प्रारंभी मराठीप्रेमींच्या वतीने क्रांतीदिनाच्या निमित्ताने हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी नव्याने क्रांती करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, मच्छिंद्र च्यारी, निवृत्ती शिरोडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
गो.रा. ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यात एकूण १० मराठी वृत्तपत्रे चालतात. गावागावांतील मंदिरे किंवा शाळा येथे प्रतिदिन कीर्तन, भजन, आदी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मराठी संस्कृती आजही येथे अबाधित आहे. विलंबाने का होईना, शासनाने मराठीला न्याय देण्यासाठी तिला राजभाषेचा दर्जा देण्याचा क्रांतीकारक निर्णय घ्यावा. हीच स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना खर्या अर्थाने आदरांजली ठरेल. मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी आता आम्हाला नव्याने क्रांती करावी लागेल अन् वेळप्रसंगी सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत.’’ या वेळी राजराम ठाकूर म्हणाले, ‘‘मराठीला राजभाषेचा मान मिळण्यासाठी गावागावांत पुन्हा बैठका घेणे आदींद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बोरकर यांनी केले, तर मच्छिंद्र च्यारी यांनी चळवळीचा आढावा मांडला. अनुराधा मोघे यांनी आभार मानले.