मराठा समाजाचे आंदोलन स्थगित केलेले नाही ! – छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षण प्रकरण

  • २१ जूनला समन्वयकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ !

(उजवीकडे) खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर मूक आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे; मात्र राज्यभरात होणारे आंदोलन अद्याप स्थगित केले नाही’, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी १७ जून या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास सवा दोन घंटे मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,

१. मराठा समाजाच्या १८ मागण्यांपैकी ६ प्रमुख मागण्यांविषयी चर्चा केली. त्याविषयी राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे; मात्र आंदोलन स्थगित झालेले नसून पुढील निर्णय २१ जून या दिवशी नाशिक येथे घेतला जाईल.

२. कोल्हापूरप्रमाणे ३६ जिल्ह्यांत मूक आंदोलन करण्याचा मानस आहे. येत्या २१ जून या दिवशी नाशिकमध्ये मूक आंदोलन नियोजित आहे; पण तिथे राज्यातील सर्व समन्वयक आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

३. मराठा समाजाने राज्य सरकारकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा घेण्यासाठी एका ‘समन्वय समिती’ची स्थापना करण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. त्यानुसार एका समितीची स्थापना केली जाईल. ही समिती प्रधान सचिव विकास खर्गे यांच्यासमवेत चर्चा करून पाठपुरावा करेल.

४. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार येत्या २४ जून या दिवशी पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार आहे; मात्र त्यासमवेतच राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींद्वारे केंद्रीय मागास आयोगाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचाही पर्याय आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली.

५. ‘मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेला १ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. ती सरकारने द्यावी’, अशी मागणी केली आहे.

६. या संदर्भात येत्या १९ जून या दिवशी पुणे येथे बैठक होणार आहे. सारथी संस्थेवर मराठा समाजाच्या हितासाठी काम करणार्‍या संचालकांना घेण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने सिद्धता दाखवली आहे.