‘साधकांची साधना घडावी आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !
‘कर्नाटक राज्यातील साधकांना साधनेची दिशा आणि साधनेतील योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी अनेक शिबिरे घेऊन साधकांना प्रोत्साहन दिले अन् ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी पुष्कळ तळमळीने प्रयत्न करून अनेक साधक घडवले. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून जाणवलेली त्यांची गुरुकार्याची तळमळ आणि त्यांच्यातील साधकांप्रती असलेला वात्सल्यभाव इत्यादी अनेक सूत्रे शिकता आली. ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी पू. रमानंदअण्णा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
(भाग १)
पू. रमानंद गौडा यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘सनातन संस्था’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘सनातन प्रभात’ इत्यादी सर्वांचे कार्य करणार्या भारतातील सर्वत्रच्या प्रचारकांना मार्गदर्शक !समष्टी साधना कशी करायची, यासंदर्भात श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक यांनी उघड केलेली धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची अद्वितीयता !‘पू. रमानंद गौडा यांनी एकट्याने कर्नाटक राज्यात ‘सनातन संस्था’, ‘हिंदु जनजागृती समिती’, साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’ इत्यादी सर्वांचे कार्य कमी वर्षांत झपाट्याने कसे वाढवले, याची मला काही वर्षे खूप जिज्ञासा होती. श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक यांनी पू. रमानंद गौडा यांच्यासंबंधी लिहिलेल्या लेखमालेमुळे ही जिज्ञासा आता उरली नाही; कारण पू. रमानंद गौडा यांच्या सर्वविध कार्यांतील सर्वच गुणांची ओळख लेखमालेमुळे झाली. याचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे ‘भारतातील सर्वच राज्यांतील प्रमुख प्रचारकांसाठी पू. रमानंद गौडा यांनी शिबिरे घेतल्यास सर्वच राज्ये कर्नाटकाप्रमाणे पुढे जातील’, हे लक्षात आले. त्यामुळे आता मला भारताची काळजी उरली नाही. माझी काळजी दूर केल्याविषयी श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक यांचा मी कृतज्ञ आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी ‘यासारखे लेख कसे लिहायचे ?’ याविषयी सर्वत्र शिबिरे घेतली,’ तर त्यांच्यासारखे लेखकही सर्वत्र सिद्ध होतील आणि त्यामुळे भारतात सर्वत्र शीघ्र गतीने प्रसार होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. ‘गुरुपौर्णिमेची सेवा चांगली व्हावी आणि त्यातून साधकांची साधना व्हावी’, यासाठी केलेले प्रयत्न
१ अ. गुरुपौर्णिमेची सिद्धता चालू असतांना पू. रमानंदअण्णांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन सिद्धता पहाणे आणि ‘परिपूर्ण सेवा होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे : ‘वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या आधी ३ – ४ दिवस पू. रमानंदअण्णा बेंगळुरू येथे गेले होते. त्या वेळी बेंगळुरू येथे असणार्या दोन्ही गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी पू. अण्णा प्रत्यक्ष गेले. तेथे गेल्यावर त्यांनी ‘गुरुपौर्णिमेची सिद्धता कशी चालू आहे ?’, हे पाहून साधकांना १५ ते २० मिनिटांत ‘सेवा परिपूर्ण करण्यासाठी सेवेची व्याप्ती काढून त्याची तपाससूची बनवून त्यानुसार कसे प्रयत्न करायचे ? समयमर्यादा घालून सेवा कशी करायची ? सेवा करतांना भाव ठेवून कसे प्रयत्न करायचे ?’, अशी अनेक सूत्रे सांगून साधनेची दिशा दिली. त्यामुळे साधकांना ‘सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण कशी करायची ?’, हे लक्षात आले.
१ आ. साधकांनी भावाच्या स्तरावर राहून सेवा केल्यामुळे त्यांना सेवेतून आनंद मिळणे : साधकांनी लगेचच त्यानुसार कृती करण्याचे प्रयत्न चालू केले. त्यामुळे सेवेतील चुकांचे प्रमाण न्यून झाल्याचे साधकांनी अनुभवले. सर्व साधकांना सेवेतील आनंदही मिळाला. सर्व साधक इतकी वर्षे गुरुपौर्णिमा साजरी करत असूनही सेवेत चुका होत होत्या; पण या वेळी सेवा भावाच्या स्तरावर झाल्यामुळे साधकांना सेवेतील फलनिष्पत्ती लक्षात आली. हा सर्व पालट केवळ ‘पू. अण्णा येथे आल्यामुळे झाला आहे’, असे साधकांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांचाच उत्साह, कृतज्ञता आणि भाव वाढला होता.
१ इ. गुरुपौर्णिमेनंतर लगेचच स्वभावदोष सत्संग घेणे, चांगली क्षमता असणार्या साधकांना हेरून त्यांना काही सेवांचे दायित्व घेण्यास सुचवणे आणि त्यामुळे सेवेची फलनिष्पत्ती वाढणे : गुरुपौर्णिमा झाल्यावर पू. अण्णांनी ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन साधकांचा स्वभावदोष सत्संग घेतला. ‘साधकांची साधना व्यवस्थित व्हावी आणि त्यांच्यात अंतर्मुखता निर्माण व्हावी’, यासाठी साधकांकडून सेवेत झालेल्या चुका घेऊन त्यांना त्यांच्यातील मूळ स्वभावदोषांपर्यंत जाण्यासाठी पू. अण्णांनी साहाय्य केले. त्याचसमवेत त्या त्या ठिकाणी दायित्व आणि परिश्रम घेऊन सेवा केलेल्या साधकांना शोधून त्यांच्यातील चांगली क्षमता असणार्या साधकांना त्यापुढचे दायित्व घेण्यास सांगितले. त्यामुळे गुरुकार्यातील वेगवेगळ्या उपक्रमांसाठी दायित्व घेण्यास नवीन साधक सिद्ध झाले आणि त्याची फलनिष्पत्ती चांगली मिळाली.
२. दायित्व घेऊन सेवा करणार्या प्रत्येक साधकाची साधना आणि सेवा परिपूर्ण होण्यासाठी ‘सुव्यवस्थापन सुनियोजन शिबिरा’चे आयोजन करणे
२ अ. साधकांचे कौशल्य आणि क्षमता हेरून त्यानुसार त्यांना सेवेचे दायित्व घेण्यास सांगणे : गुरुपौर्णिमेनंतर साधकांची क्षमता आणि कौशल्य यांनुसार अभ्यास करून साधकांना वेगवेगळे दायित्व देण्यात आले. त्यानंतर ‘जिल्ह्यातील सर्व उपक्रमांची घडी बसावी’, यासाठी जिल्हा स्तरावर ‘सुव्यवस्थापन सुनियोजन शिबिर’ आयोजित केले. या शिबिरात चांगली सेवा करणार्या साधकांना बोलावले होते.
२ आ. पू. अण्णांनी या शिबिरातील मार्गदर्शनात दायित्व घेऊन सेवा करण्याचे महत्त्व सांगणे आणि त्यामुळे साधकांमध्ये स्फूर्ती अन् सेवेविषयी सकारात्मकता निर्माण होणे : शिबिरात प्रथम पू. अण्णांनी ‘शिबिराचा उद्देश आणि महत्त्व’ याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांनी या मार्गदर्शनात ‘दायित्व घेऊन सेवा केल्याने साधना कशी होते आणि गुरुकार्यात नेतृत्व घेतल्याने आपल्यावर गुरुकृपा कशी होते ?’, याविषयी साधकांना ३० ते ४० मिनिटे मार्गदर्शन केले. शिबिराच्या आरंभी पू. अण्णांनी मार्गदर्शन केल्यामुळे साधकांवरील त्रासदायक आवरण न्यून झाले आणि साधकांमध्ये स्फूर्ती अन् सेवेविषयी सकारात्मकता निर्माण झाली.
२ इ. सेवेची व्याप्ती लक्षात आणून देण्यासाठी गटचर्चा घेणे : त्यानंतर शिबिरातील साधकांचे त्यांच्या सेवेनुसार गट करून पू. अण्णांनी त्यांच्यात वेगवेगळी गटचर्चा घेतली. त्यामध्ये पू. अण्णांनी साधकांना त्यांच्या सेवेची व्याप्ती लक्षात आणून दिली आणि ‘सेवा सोप्या पद्धतीने कशी करू शकतो ?’, हे सांगितले. त्यामुळे ‘या शिबिरात येतांना साधकांच्या मनाची स्थिती कशी होती ?’ आणि ‘गटचर्चा झाल्यावर कसे वाटत आहे ? काय पालट झाले ?’, याविषयी साधकांनीच पू. अण्णांना सांगितले.
२ ई. शिबिराच्या शेवटी पू. अण्णांनी केलेले मार्गदर्शन
२ ई १. व्यष्टी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन : ‘साधनेत पुढे जाण्यासाठी कोणते ध्येय ठेवून प्रयत्न करायला हवेत ? व्यष्टी आणि समष्टी साधनेचा योग्य समन्वय ठेवून कसे प्रयत्न करायला हवेत ? त्याग आणि प्रेमभाव कसे वाढवायचे ? साधना करतांना आपल्यात प्राधान्याने कोणते स्वभावदोष नकोत ? ‘गुरुकार्य हे स्वतःचेच कार्य आहे’, असा विचार ठेवून गुरुकार्यासाठी कसे प्रयत्नरत रहायचे ? ‘मनुष्याची पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, बाह्यमन (मन), बुद्धी, अंतर्मन (चित्त) आणि अहं यांचे कार्य’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
२ ई २. समष्टी साधना आणि सेवा यांविषयी केलेले मार्गदर्शन : पू. अण्णांनी ‘सेवेतील साधकांनी सेवा करतांना एकमेकांशी समन्वय कसा करायला हवा ? कोणताही सत्संग घेण्यापूर्वी त्याची पूर्वसिद्धता कशी करायला हवी ?’ इत्यादींविषयी उदाहरणांसहित सांगितले. या शिबिरात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील उपक्रमांची व्याप्ती कशी काढायची, त्याविषयीही माहिती सांगितली. ‘सतत सेवारत रहाण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयीही सांगितले. यामुळे साधकांना दायित्वाची जाणीव झाली आणि सेवा अन् साधना करण्याची इच्छा निर्माण झाली.
२ ई ३. भावजागृतीसाठी केलेले मार्गदर्शन : साधनेमध्ये पंचसूत्रीचा, म्हणजेच ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे’, या पाच सूत्रांचा वापर करून सेवा करण्यास अन् उत्तरदायी साधकांना ‘आत्मनिवेदन’ भावात आढावा देण्यास सांगितले. त्यानंतर पू. अण्णांनी मार्गदर्शनात गुरुदेवांची महानता भावाच्या स्तरावर सांगितली. त्यामुळे शिबिरात संपूर्ण वेळ भावाचे वातावरण निर्माण झाले.
२ उ. या शिबिरामुळे साधकांमध्ये आंतरिक पालट होऊन त्यांचा दायित्व घेऊन साधना आणि सेवा करण्याचा उत्साह वाढणे : या शिबिरानंतर साधकांमध्ये ‘आपण साधनेत कुठे न्यून पडतो ?’, याची जाणीव होऊन अंतर्मुखता निर्माण झाली. पू. अण्णांच्या मार्गदर्शनानंतर साधकांनी त्यांच्या मनातील सर्व विचार मोकळेपणाने सांगितले. पू. अण्णांनी स्वतः ३ जिल्ह्यांत जाऊन अशी शिबिरे घेतली. इतर जिल्ह्यांतील साधक ‘ऑनलाईन’ त्या शिबिरांत सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण कर्नाटकातील साधकांमध्ये उत्साह आणि ‘परिश्रम घेऊन साधना करायची आहे’, अशी इच्छाशक्ती निर्माण झाली. या शिबिरांनंतर साधकांमध्ये आंतरिक पालट झाला. सर्व जण दायित्व घेऊन सेवा करू लागल्यामुळे कार्याची फलनिष्पत्तीही वाढली. ‘दायित्व घेऊन सेवा करणे आणि सेवेसाठी अधिकाधिक वेळ देणे’, यांसाठी साधकांना प्रेरणा मिळाली. साधकांचे अशा प्रकारे प्रयत्न चालू झाल्यामुळे आता साधकांमध्येही पुष्कळ पालट दिसून येत आहे.’
– श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक. (एप्रिल २०२०)
(क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488720.html |