संभाजीनगर जिल्ह्यातील ५ पर्यटनस्थळे उघडण्यास अनुमती; पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील धार्मिक स्थळे मात्र बंदच !

केवळ उत्पन्नाचे साधन असलेली ठिकाणे खुली करणे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवणे दुर्दैवी आहे. यावरून प्रशासनाला भाविकांच्या श्रद्धांशी काही देणे-घेणे नाही, हेच लक्षात येते !

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

संभाजीनगर – जिल्ह्यातील वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबादचा देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा आणि संभाजीनगर लेणी ही ५ प्रसिद्ध पर्यटनस्थळे उघडण्यास १६ जूनपासून पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. पहिल्या दिवशी या स्थळांच्या स्वच्छतेची कामे करण्यात आली. १७ जूनपासून नागरिकांना प्रवेश देण्यात आला आहे; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी प्रत्येक पर्यटनस्थळावर दिवसभरात केवळ २ सहस्र  लोकांनाच अनुमती दिली जाईल.

सकाळच्या सत्रात १ सहस्र आणि दुपारच्या सत्रात १ सहस्र लोकांना प्रवेश देण्यात येईल. ‘ऑनलाईन’ नोंदणी करणार्‍यांनाच प्रवेश दिला जाईल. या पाचही पर्यटनस्थळांच्या परिसरातील विक्रेते, माहिती सांगणारे (‘गाईड’) यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याविषयी आदेश काढले आहेत. ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळांतर्गत येणारी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे मात्र बंदच रहातील’, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.