ज्येेष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, ग्रीष्मऋतू, ज्येेष्ठ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.६.२०२१ पासून दक्षिणायन आणि २५.६.२०२१ पासून कृष्ण पक्ष चालू होणार आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. दशहरा समाप्ती, गंगावतार : पूर्वान्हव्यापिनी ज्येष्ठ शुक्ल दशमी तिथीला दशहरा समाप्ती करतात. दशहरा समाप्तीच्या दिवशी दशयोग – १. ज्येष्ठ मास, २. शुक्ल पक्ष, ३. दशमी तिथी, ४. बुधवार, ५. हस्त नक्षत्र, ६. व्यतीपात योग, ७. गरज करण, ८. कन्या राशीत चंद्र ग्रह, ९. आनंद योग = बुधवार + हस्त नक्षत्र आणि १०. वृषभ राशीत रवि ग्रह, यांपैकी अधिक योग असलेल्या दिवशी दशहरा समाप्ती, गंगावतार आणि गंगापूजन करतात.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २०.६.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.०० पासून २१.६.२०२१ या दिवशी दुपारी १.३२ पर्यंत, २३.६.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.३३ पासून २४.६.२०२१ या दिवशी दुपारी १.५० पर्यंत, तसेच २६.६.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.५९ पासून विष्टी करण आहे.
२ इ. निर्जला एकादशी : ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशीला ‘निर्जला एकादशी’ म्हणतात. २१.६.२०२१ या दिवशी निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीच्या उपोषणाने बारा एकादशींच्या व्रताचे फळ मिळते. या एकादशीला ‘पांडव एकादशी’ असेही म्हणतात. ‘महाबलशाली भीमाने या एकादशीचे व्रत करून सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त केले होते’, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या एकादशीला ‘भीमसेनी एकादशी’ असेही म्हणतात. ‘या व्रताने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात’, असे मानले जाते. या दिवशी भगवान श्रीविष्णूचे पूजन करतात. एकादशी माहात्म्य आणि श्रीविष्णुसहस्रनाम वाचन करतात. दुसर्या दिवशी एकादशी व्रताच्या फलप्राप्तीसाठी सोने, साखर आणि जलकुंभ दान करतात.
२ ई. दक्षिणायनारंभ : २१ जून या दिवसापासून दक्षिणायन चालू होते. सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस दक्षिणेला झुकण्याला ‘दक्षिणायन’ म्हणतात.
२ उ. जागतिक योग दिन : २१ जून हा सर्वत्र ‘योगदिन’ म्हणून साजरा करतात.
२ ऊ. कर्कायन : २१.६.२०२१ या दिवशी सकाळी ९.०१ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) कर्क राशीत प्रवेश करत आहे.
२ ए. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २१.६.२०२१ या दिवशी दुपारी १.३२ ते सायंकाळी ४.४५ आणि उत्तररात्री ५.३८ पासून २२.६.२०२१ या दिवशी सकाळी १०.२२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ऐे. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २१.६.२०२१ या दिवशी सोमवार असून सूर्योदयापासून दुपारी १.३२ पर्यंत एकादशी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
२ ओ. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. सोमवारी सायंकाळी ४.४५ पासून विशाखा नक्षत्र असल्याने दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत यमघंट योग आहे.
२ औ. भौमप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. मंगळवारी येणार्या त्रयोदशी तिथीला ‘भौमप्रदोष’ म्हणतात. २२.६.२०२१ या दिवशी भौमप्रदोष आहे. आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी ‘भौमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष व्रतामध्ये सोमवारी येणार्या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ अं. शिवराज्याभिषेकोत्सव दिन : सूर्योदयव्यापिनी ज्येष्ठ शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथीला शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा करावा. २३.६.२०२१ या दिवशी सकाळी ७.०० पर्यंत ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तिथी आहे.
२ क. अमृत योग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने अमृत योग होतो. यालाच ‘अमृतसिद्धी योग’ म्हणतात. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २३.६.२०२१ या दिवशी हा योग सूर्योदयापासून सकाळी ११.४८ पर्यंत आहे. बुधवारी २३.६.२०२१ या दिवशी सकाळी ११.४८ पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे.
२ ख. वटपौर्णिमा : सूर्यास्तापूर्वी सहा घटिका चतुर्दशीने विद्ध असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी वटपूजन करावे. सूर्यास्तापूर्वी सहा घटींपेक्षा चतुर्दशी कमी असल्यास दुसर्या दिवशी पौणिमेला वटपूजन करावे. पूजेच्या वेळी पौर्णिमा असली पाहिजे, असे नाही. हे सौभाग्यव्रत असून त्यात ‘सात जन्म हाच पती मिळावा’, असा संकल्प नाही. सौभाग्य याचा अर्थ ‘पती, धन-धान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र इत्यादी’, असा आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी. त्या वृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करू नये. वडाच्या चित्राची किंवा गंधाने वडाच्या झाडाचे चित्र काढूनसुद्धा पूजा करता येईल. गर्भवती स्त्रीचे स्वास्थ ठीक असेल, तर ती ९ व्या मासापर्यंत वटपूजन करू शकते. २४.६.२०२१ या दिवशी वटपौर्णिमा आहे.
२ ग. मन्वादि : ज्येष्ठ पौर्णिमा तिथीला ‘मन्वादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – एकादशी, क्षयतिथी दिन, अमृत योग, घबाड मुहूर्त, दग्ध योग, भद्रा (विष्टी करण), प्रदोष, कुलधर्म, यमघंट आणि अन्वाधान यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. |
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(५.६.२०२१)