रुद्राक्षाच्या लोलकाची होणारी हालचाल
शिव रुद्राक्षाची माळ धारण करतो. ‘रुद्राक्ष’ हे बीज सात्त्विक आहे. त्यामध्ये २ टक्के शिवतत्त्व कार्यरत असते. रुद्राक्षामध्ये चांगली स्पंदने धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अनेक ऋषिमुनी रुद्राक्षाच्या माळा धारण करतात. रुद्राक्षाने लोलकाप्रमाणे प्रयोग करून ‘एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे कि नाही ?’, याचे परीक्षण करू शकतो.
१. व्यक्तीची इडा, पिंगळा किंवा सुषुम्ना नाडी चालू असेल, तर त्याप्रमाणेही रुद्राक्ष फिरणे
व्यक्तीने रुद्राक्षाचा लोलक हातात घेतल्यावर व्यक्तीची जी नाडी चालू आहे, त्याप्रमाणे रुद्राक्ष हलतो, उदा. इडा नाडी चालू असेल, तर रुद्राक्ष डाव्या बाजूकडे आडवा फिरतो आणि पिंगळा नाडी चालू असेल, तर रुद्राक्ष उजव्या बाजूकडे आडवा फिरतो. व्यक्तीची सुषुम्ना नाडी चालू असेल, तर रुद्राक्ष डावीकडून उजवीकडे वर्तुळाकारात वेगाने फिरतो. एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे का ? याचे परीक्षण करण्यासाठी सुषुम्ना नाडी चालू असणार्या म्हणजे, चांगली साधना करणार्या व्यक्तीने रुद्राक्ष हाताळणे योग्य आहे. अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्या आणि सकारात्मक ऊर्जा असणार्या व्यक्तीने रुद्राक्षानेे परीक्षण केल्यास ते अधिकाधिक अचूक येते, उदा. वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांतून त्रासदायक स्पंदने येत असल्यास रुद्राक्ष घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो आणि सकारात्मक स्पंदने येत असल्यास घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो.
२. रुद्राक्षाची हालचाल न होणे याचा अर्थ
एखाद्या वस्तूचे परीक्षण करतांना त्यातून चांगली किंवा त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अत्यल्प असेल, तर रुद्राक्षाची हालचाल होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये चांगली आणि त्रासदायक स्पंदने सारख्याच प्रमाणात असतील, तरीही त्या व्यक्तीचे परीक्षण करतांना रुद्राक्षाची हालचाल न होता तो स्थिर रहातो.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२०)
|