नगर येथे अवैध वाळू उपसा विरोधात ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी यांचे आंदोलन !
- असे आंदोलन का करावे लागते ? अनेकदा तक्रारी करूनही त्यावर कारवाई न करणार्या निष्क्रिय अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ करावे, असे म्हटल्यास चूक ते काय !
- संगमनेर हा महसूलमंत्र्यांचा तालुका असूनही येथील वाळू उपशाची परिस्थिती नियंत्रणात का येत नाही ? महसूलमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून ही समस्या त्वरित सोडवावी, ही जनतेची अपेक्षा आहे !
नगर – संगमनेर तालुक्यात वाळू उपशाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ यांनी प्रवरा नदीपात्रात झोपून आंदोलन केले. संगमनेर जवळील खांडगाव येथेही या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यांना रात्रीची झोपही अशक्य झाली आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रातील पुरातन घाट आणि मंदिरे यांना धोका निर्माण झाला आहे. वाळू उपशासाठी अनेक मध्यस्त तयार झाले असून त्यांचे प्रशासनाशी लागेबांधे आहेत. वाळू माफियांवर कारवाई न होता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालू असल्याने त्यांचे धाडस वाढत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.