आमदारांच्या कारखान्याने शेतकर्यांच्या नावावर बोगस कर्ज घेतल्याप्रकरणी करमाळ्यात आंदोलन !
आमदार संजय शिंदे यांनी यात लक्ष घालून शेतकर्यांची फसवणूक झाली असल्यास तात्काळ कर्जाची रक्कम फेडायला हवी ! अन्यथा जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी विश्वासार्हता रहाणार नाही, असेच म्हणावे लागेल !
पुणे – करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याने शेतकर्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारखान्याने वर्ष २०१३ मध्ये शेतकर्यांना खत देतो, असे सांगून त्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, सातबाराचा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेतल्या होत्या. संबंधित शेतकर्यांना खत मिळाले नाही; मात्र २९ मे २०२१ नंतर पंजाब नॅशनल बँकेच्या अधिवक्त्यांनी संबंधित शेतकर्यांना नोटीस (सूचना) पाठवून कर्जाची रक्कम त्वरित भरावी, अन्यथा फौजदारी कारवाई करावी लागेल, अशी चेतावणी दिली. त्यानंतर साखर कारखान्याने बोगस कर्ज उचलल्याचे समोर आले. यासंदर्भात न्याय न मिळाल्याने शेतकर्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले आणि रस्त्यावर मागितलेली भीक बँक आणि आमदार संजय शिंदे यांना दिली.