निर्बंध शिथिल केल्यावर नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसरी लाट भयावह ठरू शकते ! – केंद्रीय गृहमंत्रालयाला भीती
नवी देहली – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना अनेक राज्यांनी घातलेले निर्बंध शिक्षिल करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे पुन्हा रस्त्यांवर, तसेच बाजारांत गर्दी दिसू लागली आहे. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भीती व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या अधिकार्यांमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. ‘निर्बंध उठवल्यानंतर जर लोकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसेल, तर कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती अत्यंत भयावह असेल’, अशी भीती या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा आदेश दिला. राज्यांच्या सचिवांना आदेश देतांना सांगण्यात आले आहे की, जर नागरिक नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. (नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच अन्य नागरिकांवर वचक बसत नाही आणि तेही त्याचे उल्लंघन करतात, त्यामुळे या प्रकारांना पोलीस आणि प्रशासनच अधिक उत्तरदायी आहेत ! – संपादक)