गुजरातच्या साबरमती नदीमध्ये आढळले कोरोनाचे विषाणू !

साबरमती नदी

कर्णावती (गुजरात) – येथील साबरमती नदीसह कांगरिया आणि चांदोला तलावांतील पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळले. यासह आसाममधील गोहत्ती येथील नद्यांमधील पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील भारू नदीतून घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये कोरोना विषाणू आढळला. नद्यांमधून जे नमुने घेण्यात आले त्यामध्ये विषाणूचे अस्तित्व फार अधिक दिसून आले.

नद्यांच्या पाण्यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी देशातील ८ संस्थांनी शोध घेतला. गुजरातच्या गांधीनगर येथील ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मनीष कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ सांडपाण्याच्या नाल्यामध्येच कोरोना विषाणू जीवित दिसून आला होता; मात्र नदीच्या पाण्याचे नमुने पडताळले असता त्यात कोरोनाचे विषाणू आढळले. कर्णावतीमध्ये सांडपाण्याची शुद्धी करण्याचे सर्वाधिक प्रकल्प आहेत, तर गोहत्तीममध्ये एकही नाही. दोन्हीकडील पाण्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळले. त्यामुळे ‘कोरोना विषाणू हा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्येही जिवंत राहू शकतो’, अशी माहिती समोर आली आहे.