आधुनिक वैद्यांवर होणार्या आक्रमणाच्या निषेधार्थ आय.एम्.ए.च्या आधुनिक वैद्यांचे काळ्या फिती लावून काम !
पुणे – आधुनिक वैद्यांवर होणार्या आक्रमणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय शाखेने १८ जून या दिवशी निषेधदिन पुकारला आहे. जीव वाचवणार्या डॉक्टरांचे रक्षण करा, असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे आधुनिक वैद्य काळ्या फिती लावून या निषेध कार्यक्रमाला आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. आय.एम्.ए. पुणे शाखेचे अध्यक्ष आधुनिक वैद्य बी.एल्. देशमुख आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखेचे अध्यक्ष आधुनिक वैद्य संजय पाटील यांनी १६ जून या दिवशी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.
आधुनिक वैद्य पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि स्थानिक महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले जाईल. सामाजिक प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने आधुनिक वैद्यांची बाजू समाजापर्यंत पोचवली जाईल, तसेच सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे.
आधुनिक वैद्य देशमुख म्हणाले, सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी. आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर आक्रमण करणार्यांच्या विरोधातील गुन्हे जलदगती न्यायालयामध्ये चालवले जावेत, तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे.