… तर १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ! – शासननियुक्त ‘टास्क फोर्स’
मुख्यमंत्र्यांकडून डॉक्टर आणि अधिकारी यांना सिद्धतेचे आदेश
मुंबई – शासनाने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती कोरोनाविषयी राज्यशासनाने नियुक्त केलेल्या ‘टास्क फोर्स’ ने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पालटलेल्या ‘डेल्टा प्लस’ या विषाणूमुळे ही लाट येण्याची शक्यता ‘टास्क फोर्स’ ने व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १७ जून या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ‘टास्क फोर्स’ कडून ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, तर दुसर्या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद आहे. तिसर्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत जाऊ शकते. यामध्ये १० टक्के मुलांचा समावेश असू शकतो, अशी शक्यता ‘टास्क फोर्स’ च्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ‘टास्क फोर्स’ ने वर्तवलेल्या धोक्यावरून उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर आणि अधिकारी यांना औषध अन् आरोग्य उपकरणे सिद्ध ठेवण्याचे, तसेच ग्रामीण भागात औषधे आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.