चारचाकी वाहनाच्या टपाच्या कडेला ठेवलेली पूजेच्या साहित्याची थाळी वाहनाने अर्धा किलोमीटर अंतराचा प्रवास करूनही आहे तशी व्यवस्थित असल्याविषयी आलेली अनुभूती
‘२०.४.२०२० या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे शिवमंदिरातील पूजा करण्यासाठी निघालो. तेव्हा मी नित्याप्रमाणे एक थाळी (ताट) घेतली. त्या थाळीत फुले, पेल्यात नैवेद्यासाठी दूध आणि साखर घेतली अन् आश्रम परिसरात पूजेसाठी फुले तोडण्यासाठी गेलो. कुंदाच्या सुगंधी फुलांचा बहर चालू असल्याने फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ‘महादेवाला कुंदाची फुले आवडतात’, असा विचार करून मी पूजेचे ताट कुंदाच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या टपावर ठेवले आणि हातात वाटी घेऊन फुले काढू लागलो. मी एक-एक फूल खुडतांना ‘ॐ नमः शिवाय ।’, असा नामजपही करत होतो. मी काढलेली फुले वाटीत ठेवली आणि नंतर मागे वळून पाहिले, तर थाळी ठेवलेले चारचाकी वाहन तेथून निघून गेले होते.
मी प्रवेशद्वाराजवळ येऊन विचारपूस केली, तर चारचाकी वाहन सुमारे अर्धा किलोमीटर दूर निघून गेल्याचे मला समजले. तेथे असलेल्या २ साधकांनी त्या चारचाकी वाहनाच्या टपावरील थाळी पाहिली होती; पण त्यांना काही लक्षात आले नव्हते. मी ती पूजेच्या सामग्रीची थाळी वाहनाच्या अगदी शेवटच्या टोकावर ठेवली होती.
तेव्हा तेथे असलेल्या वाहनचालकाने वाहन घेऊन गेलेल्या साधकाला भ्रमणभाष करून वाहन थांबवण्यास सांगितले आणि लगेचच स्वतः स्कूटर घेऊन पूजेची थाळी आणण्यासाठी गेला. तेव्हा ‘ती थाळी वाटेत कुठेतरी पडली असेल, तिच्यातील दूध सांडले असेल आणि फुलेही पडली असतील’, असे मला वाटले होते; पण काय आश्चर्य ! ती थाळी जशीच्या तशी होती. पेल्यातील दुधाचा एक थेंबही सांडला नव्हता, ही सर्व भगवान शिवाची लीला असल्याचे माझ्या लक्षात आले.’
– श्री. प्रभाकर प्रभुदेसाई, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२४.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाचयेतील असे नाही. – संपादक |