मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जून या दिवशी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ७९ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही मासांपासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये धुसफुस चालू आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी राज्यपालांवर टीकाही केली आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी १२ सदस्यांच्या नावांची सूची पाठवून ६ मास झाले, तरी राज्यपालांकडून सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांचा विषय मांडला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.