व्यष्टी आणि समष्टी साधना यांची तीव्र तळमळ अन् गुरुवचनांवर दृढ श्रद्धा असलेले पू. बन्सीधर श्रीधर तावडेआजोबा !
१. श्री. राजेंद्र पाटील, पिंगुळी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
१ अ. पू. तावडेआजोबांची वृत्ती मुळातच सात्त्विक होती. त्यांनी डिगस अन् त्याच्या आजूबाजूच्या गावांत अध्यात्मप्रसाराचे कार्य तळमळीने केले.
१ आ. त्यांना संत किंवा साधक घरी आल्यावर पुष्कळ आनंद व्हायचा.
१ इ. हिंदु राष्ट्राचा ध्यास : पू. आजोबांना हिंदु राष्ट्राचा ध्यास होता. त्यांना कुणीही भेटायला गेले, तरी ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी उत्स्फूतर्र्पणे आणि उत्साहाने बोलायचे. त्यांचा राष्ट्र, धर्म आणि सामाजिक परिस्थिती यांविषयी सखोल अभ्यास होता.
१ ई. श्रद्धा : त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा होती. ते जिज्ञासूंना सांगायचे, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर हे विश्वगुरु असून त्यांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.’’
२. श्री. गजानन मुंज, कडावल, जि. सिंधुदुर्ग.
२ अ. स्वतःच्या देहाकडे साक्षीभावाने पहाणे : ‘पू. आजोबांना अर्धांगवायू झाला होता. ते चाकांच्या आसंदीवरून (व्हीलचेअरवरून) घरातल्या घरात फिरायचे आणि क्वचित् प्रसंगी चालायचे. ते स्वतःच्या आजारपणाविषयी कधी नकारात्मक बोलत नसत. त्यांना स्वतःचे काहीच करता येत नव्हते, तरीही ते कधीच दुःखी नव्हते. ‘ते स्वतःच्या देहाकडे साक्षीभावाने पहात आहेत’, असे जाणवायचे.
२ आ. सकारात्मकता : पू. आजोबा नेहमी सकारात्मक विचार करायचे. त्यांना अर्धांगवायू झाल्यावर ते म्हणायचे, ‘‘देवाने माझा अहं न्यून करण्यासाठीच मला हे आजारपण दिले आहे. ‘मी हिंदु राष्ट्र्रासाठी प्रयत्न केले’, असा माझा अहं वाढू नये’, यासाठी देवाने मला जागेवर बसवले.’’
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा : ते सांगायचे, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र आणणारच आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी हिंदु राष्ट्र आणलेलेच आहे. साधकांनी केवळ स्वत:ची साधना म्हणून त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि स्वत:चा उद्धार करून घ्यायचा आहे.’’ त्यांची हिंदु राष्ट्र ‘याची देही, याची डोळां’ पहाण्याची तीव्र इच्छा होती; परंतु ‘नियतीच्या पुढे कुणाचेच काही चालत नाही’, हेच सत्य आहे.’
३. श्रीमती स्नेहप्रभा अणावकर, पणदूर, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
३ अ. अहंशून्यता : ते संत असूनही साधकांना संपर्क करून संस्थेच्या कार्याविषयी नवीन सूत्रे जाणून घ्यायचे.
३ आ. श्रद्धा : मी पू. आजोबांना भ्रमणभाष केल्यावर ते प्रथम माझ्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस करायचे. ते मला सांगायचे, ‘‘घाबरू नका. आपले परम पूज्य आहेत. ते आपली काळजी घेणारच आहेत.’’
४. डॉ. संजय सामंत, पिंगुळी, कुडाळ
४ अ. रुग्णाईत असतांनाही ‘साधना, आपत्काळ आणि हिंदु राष्ट्र’ याच विषयांवर बोलणे : पू. आजोबा त्यांना भेटायला येणार्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय तळमळीने सांगायचे, ‘‘हिंदु राष्ट्र येणे अटळ आहे आणि ते पहाण्यासाठी साधना करा.’’ त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. तेव्हा त्यांच्या बोलण्यात ‘साधना, आपत्काळ आणि हिंदु राष्ट्र’ हेच विषय होते.
४ आ. कृतज्ञताभाव : ज्या साधकांनी त्यांना साधनेत साहाय्य केले, त्या सर्व साधकांविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत असे. त्यांच्या बोलण्यातून हे प्रकर्षाने जाणवायचे.
४ इ. त्यांच्याशी बोलताना आनंदाची अनुभूती येत असे.
५. श्रीमती जयश्री सुर्वे, डिगस, ओरोस
५ अ. सेवेची तळमळ : पू. आजोबांशी आमची सेवेच्या निमित्ताने जवळीक होती. माझे यजमान आणि पू. आजोबा नेहमी दुचाकीवरून सेवेसाठी दूरवरच्या गावागावांत जायचे. त्यांना जवळपासच्या गावातील सगळे लोक ओळखत असत. ते सर्वांना साधना सांगत असत.
५ आ. आम्ही त्यांच्या घरी कधीही गेलो, तरी ते आमचे उत्साहाने स्वागत करायचे.’
६. श्री. पुंडलिक गवस, ओरोस, जि. सिंधुदुर्ग.
६ अ. उतारवयातही तळमळीने सेवा करणे : पू. आजोबांनी वर्ष १९९७ मध्ये ओरोस येथे प.पू. गुरुदेवांची पहिली सभा ऐकली. त्यानंतर ‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यासच आपली आध्यात्मिक उन्नती होईल’, असे त्यांना वाटलेे. त्यामुळे त्यांनी आमच्या समवेत राहून प्रसाराचे कार्य आणि मिळेल ती सेवा केली. त्यांना दूरभाष केल्यावर त्यांचे वय झालेले असूनही ते सेवेला यायचे.
६ आ. कृतज्ञताभाव : मी आणि सौ. गवस त्यांच्या घरी गेल्यावर ते म्हणायचे, ‘‘तुम्ही मला गुरुदेवांच्या सभेचे निमंत्रण दिले. त्यामुळेच माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली.’’
६ ई. अनुभूती
१. पू. आजोबांना भेटल्यावर मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच भेटत आहे’, असे वाटायचे आणि मी नतमस्तक व्हायचो.
२. ‘आता ते आमच्यात नाहीत, तरी त्यांनी देहत्याग केला’, असे वाटतच नाही. ‘ते आमच्यामध्येच आहेत’, असे वाटते.
७. श्री. सखाराम देसाई, लांजा, जि. रत्नागिरी.
७ अ. व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ : ते वयोवृद्ध असूनही ऊन किंवा पाऊस यांचा विचार न करता आमच्या समवेत प्रसाराला यायचे. ते प्रसारात आमच्या समवेत असतांना आम्हाला त्यांचा आधार वाटत असे. त्यांची साधनेविषयीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नंतर वयोमानामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते, तरी ते भ्रमणभाषद्वारे साधनेचा विषय लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी व्यष्टी साधना करून गुरुदेवांची कृपा संपादन केली आणि संतपद गाठले.
७ आ. शेवटच्या दिवसांतही साधनेविषयीच बोलणे : पू. आजोबांनी देहत्याग करण्यापूर्वी १५ दिवस मी त्यांना भ्रमणभाष केला होता. तेव्हा त्यांच्या बोलण्यात केवळ ‘साधना’ हाच विषय होता. त्यांच्या बोलण्यातून परात्पर गुरुदेवांप्रती असलेला भाव जाणवत होता. साधनेमुळे त्यांची स्मरणशक्तीही उत्तम होती. त्यांच्यातील ‘साधनेची तीव्र तळमळ आणि गुरुवचनांवरील गाढ श्रद्धा’ या त्यांच्या गुणांना मी त्रिवार वंदन करतो.