जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने समाजातील व्यक्तींकडून साधकांना मिळालेली आपुलकीची वागणूक आणि धर्माभिमान्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘१.३.२०२० या दिवशी जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेत धर्मप्रेमींचा उत्साह जाणवत होता. मी धर्मकार्यातील त्यांचा सहभाग प्रथमच अनुभवत होते. साधकांकडून भावाच्या स्तरावर सेवा होत होती. सेवा करतांना कर्तेपणा न्यून व्हायला साहाय्य मिळत होते. साधकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न होत असल्याने साधक प्रसार करतांना आनंद अनुभवत होते.
१. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार भगवंतच करून घेत आहे’, असे क्षणोक्षणी अनुभवणे
१ अ. एका भाजीवाल्याने आवश्यक तेवढी भाजी, तर दुसर्याने लिंबे अर्पण देणे : ‘सभेच्या प्रसारासाठी आलेले साधक आणि कार्यकर्ते यांच्या भोजनासाठी भाजी अर्पण मिळते का ?’, हे पहाण्यासाठी आम्ही मंडईत गेलो होतो. आम्ही एका भाजीवाल्यांकडे गेलो. त्यांनी ‘किती भाजी हवी आहे ?’, असे विचारून आवश्यक तेवढी भाजी लगेच दिली. तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावर ‘धर्मकार्यासाठी देत आहे’, असा भाव जाणवत होता. नंतर आम्ही एका भाजीवाल्याकडे लिंबे अर्पण मागितली आणि त्याने एक गोणी लिंबे अर्पण दिली. ती लिंबे चांगली निवडलेली होती.
१ आ. भोजन व्यवस्थेसाठी आवश्यक ती भांडी मिळणे : सभेच्या प्रसारासाठी आलेल्या धर्मप्रेमी आणि साधक यांच्या भोजन व्यवस्थेसाठी भांडी अन् अन्य वस्तू हव्या होत्या. त्यासाठी आम्ही ४ – ५ भांडीवाल्यांकडे गेेलो. त्यांनी भांड्यांची सूची पाहिली आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली भांडी आम्हाला दिली.
१ इ. धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी सभेचा प्रसार करणे : पिंप्राळा येथील ६ महिला आणि शिवाजीनगर येथील ४ महिला सभेच्या प्रसाराला आल्या होत्या. ‘सर्व हिंदूंनी सभेला उपस्थित रहावे’, अशी त्यांची तळमळ जाणवत होती. एकदा प्रसार करतांना २ महिलांना चक्कर आली, तरी त्या दुसर्या दिवशी प्रसाराला आल्या. दिवसभराचा प्रसार झाल्यानंतर साधक त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगायचे. तेव्हा त्या महिलाही प्रांजळपणे चुका सांगायच्या. त्या वेळी त्यांच्यात धर्मकार्याची तळमळ जाणवायची.
१ ई. धर्मप्रेमींनी धर्मकार्यासाठी स्वतःहून अर्पण देणे : काही धर्मप्रेमी सभेची उद्घोषणा ऐकून धर्मकार्यासाठी अर्पण देत होते. एका धर्मप्रेमीने ‘सेवाकेंद्रात येऊन सभेसाठी काही किराणा साहित्य हवे का ?’, असे विचारून स्वतः साहित्य आणून दिले.
१ उ. समाजातील हिंदूंनी साधकांना आपुलकीने वागवणे : प्रसार करतांना ‘दुपारी जेवणासाठी येथे बसू शकतो का ?’, असे विचारल्यावर कुणीही जागा उपलब्ध करून द्यायचे आणि आवश्यक ती व्यवस्थाही करून द्यायचे. एखाद्या कार्यालयात प्रसारासाठी गेल्यावर ते साधकांना थांबवून चहाही द्यायचे. त्या वेळी समाजातील हिंदूंची धर्मप्रसार करणार्या साधकांप्रती असलेली आपुलकी दिसून यायची.
२. भगवंताची कृपा आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे अस्तित्व यांमुळे कार्य होत असणे : सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी प्रसार करणार्या साधकांना मार्गदर्शन केले आणि त्या दिवसापासून प्रसारातील अडथळे अन् अडचणी दूर झाल्या. मला माझ्यात सकारात्मक पालट जाणवू लागला. समाजातून चांगला प्रतिसादही मिळू लागला. त्या वेळी ‘सद्गुरु जाधवकाकांतील निर्गुण तत्त्व कार्यरत आहे’, असे मला वाटत होते. साधकांना त्यांचे पितृतुल्य प्रेम अनुभवायला मिळत होते. त्यामुळे साधकांना सेवा करायला शक्ती मिळत होती. त्यांच्या मनात नकारात्मक विचार येत नव्हते.
‘श्रीकृष्ण सभेचा आयोजक आहे’, या भावाने सेवा होत होती आणि ‘सद्गुरु जाधवकाकांच्या अस्तित्वाने कार्य होत आहे’, असे वाटत होते.’
– सौ. धनश्री शिंदे, जळगाव
३. एका अधिवक्त्यांनी साधकांचे कौतुक करणे आणि ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होणे
‘एकदा आम्ही एका घरी प्रचारासाठी गेलो होतो. तेव्हा ‘त्या घरातील महिलेने अर्पण देणार नाही’, असे सांगितले. आम्ही बोलत असतांना त्या महिलेचे यजमान तेथे आले. ते अधिवक्ता आहेत. त्यांनी आम्हाला ‘हिंदु जनजागृती समितीकडून आलात का ?’, असे विचारले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले कार्य करता. तुमचे पाय धरावेसे वाटतात.’’ ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.’
– सौ. अलका ठाकरे, म्हाबळ, जळगाव (मार्च २०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |