धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे हिंदुत्वनिष्ठांना विविध विषयांवर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

श्री. सुनील घनवट

दुर्ग (छत्तीसगड) – हिंदूंमध्ये धर्माभिमानाचा अभाव असल्यामुळे प्रतिवर्षी लक्षावधी हिंदू अन्य धर्मांचा स्वीकार करतात. या धर्मांतरामुळे हिंदूंच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. छत्तीसगडमध्ये आशिया खंडातील दुसरे सर्वांत मोठे चर्च जशपूर कुनकुरी येथे उभारले आहे. सरगुजा प्रांतातच वैध आणि अवैध १ सहस्रांहून अधिक ठिकाणी प्रार्थनासभा होतात. तत्कालीन मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या कार्यकाळामध्ये छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात धर्र्मांतर झाले; पण हिंदूंना धर्मशिक्षण देऊन स्वधर्माचा स्वाभिमान टिकवून धर्मांतर कसे रोखायचे, याविषयीचे प्रयत्न अल्प पडले. आपले प्रयत्न जरी अल्प झाले असले, तरी अशा कार्यक्रमांतून आपण जागृत होऊन ‘हिंदु धर्मप्रचारक’ म्हणून सिद्ध होऊया. तसेच आपण धर्मांतर रोखण्यासाठी आणि धर्मांतरविरोधी कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करूया. आज छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांत पुष्कळ प्रमाणात धर्मांतर होत आहे. आदिवासी हिंदूंवर ‘ते हिंदु नसून त्यांचा आदिवासी हा वेगळा धर्म आहे’, असे बिंबवले जात आहे. त्यांना धर्मापासून वेगळे करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हे केवळ आदिवासींपुरतेच मर्यादित नसून प्रशासकीय स्तरावरही धर्मांतरित झालेल्या अनेक अधिकार्‍यांकडून त्यांच्या अंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचेही धर्मांतर झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्मांतराचे षड्यंत्र रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘धर्मांतराचे षड्यंत्र’ या विषयावर बोलतांना केले. ‘धर्मसेना, छत्तीसगड’ या संघटनेच्या वतीने प्रत्येक आठवड्यात श्री. घनवट यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन आयोजन करण्यात आले आहे.  या मार्गदर्शनाच्या वेळी धर्मांतर होणार्‍या गावांतील अनेक धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले.

विशेष

१. ‘धर्मांतराचे षड्यंत्र’ या विषयावरील मार्गदर्शन झाल्यानंतर अनेक धर्मप्रेमींनी कृतीशील होऊन पोलिसांना विविध विषयांवरील निवेदने आणि तक्रारी देण्यास प्रारंभ केला.

२. प्रत्येक धर्मप्रेमीने त्यांच्याकडील स्थानिक ग्रामसभेत एक प्रस्ताव पारित करण्याचे ठरवले की, गावात नवीन कुणी येत असेल, तर त्याची नोंदणी करावी आणि धर्मांतर करणारे कुणी आढळल्यास लगेचच तक्रार करण्यात यावी.

३. देशभरात धर्मांतरबंदी कायद्याची आणि छत्तीसगडमधील कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे यांविषयी मागणी करणारे निवेदन देण्यास प्रारंभ केला आहे.

क्षणचित्रे

१. बाल्को येथील धर्माभिमानी श्री. नरेश राजपूत यांनी धर्मांतर थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी या वेळी माहिती दिली.

२. कार्यक्रमाची वेळ संपल्यानंतर अर्धा घंट्याहून अधिक काळ शंकानिरसन चालले. धर्मांतराविषयी धर्माभिमान्यांमध्ये असलेली प्रचंड जिज्ञासा पाहून पुढील वेळी या विषयावर अधिक विस्तृत मार्गदर्शन घेण्याचे ठरले.

श्री. सुनील घनवट यांनी विविध विषयांवर केलेल्या मार्गदर्शनावर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले अभिप्राय

  • आजवर आम्हाला इतके सुस्पष्ट मार्गदर्शन कुणीच केले नव्हते. या कार्यक्रमातून योग्य विचार आणि कृतीची दिशा आम्हाला मिळाली आहे, असे हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी सांगितले.
  • ‘श्री. सुनील घनवट यांनी विविध विषयांवर केलेल्या मार्गदर्शनांमधून एका व्यापक कार्याशी जुळण्याची संधी मिळाली. त्यामुळे हिंदु राष्ट्रासाठी आता अधिक जोमाने कार्य करू’, असे एक हिंदुत्वनिष्ठ म्हणाले.
  • अनेकांनी असेही सांगितले की, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आदर्श वक्ता बनवण्याविषयी आणि हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्याविषयीचे नियोजन करतो.
  • श्री. घनवट यांच्या मार्गदर्शनामुळे हिंदुत्वाविषयी नेमके काय करायचे, ते कळले. तसेच आम्हाला कार्याविषयी चेतना मिळून मरगळ दूर झाली आणि आम्ही समितीच्या कार्यात नियमित सहभागी होऊ.

श्री. सुनील घनवट यांनी विविध विषयांवर केलेले मार्गदर्शन

१. हिंदु राष्ट्राची मागणी घटनात्मक आहे का ?

२. लोकशाहीची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता

३. ‘हलाल प्रमाणपत्र : एक आर्थिक जिहाद’ (या विषयावरील मार्गदर्शनाला व्यापारी आणि व्यावसायिक सहभागी झाले होते.)

तन, मन आणि धनाने धर्मकार्य करण्यास सिद्ध असलेले ‘धर्मसेना छत्तीसगड’चे श्री. विष्णु पटेल !

हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्याशी ‘ऑनलाईन’ संपर्क झाल्यानंतर ‘धर्मसेना, छत्तीसगड’चे श्री. विष्णु पटेल पुष्कळ प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी श्री. घनवट यांचे मार्गदर्शन आयोजित केले.

या कार्यक्रमानंतर ते म्हणाले, ‘‘समाज, राष्ट्र आणि धर्म यांची सद्यःस्थिती ऐकून हिंदु राष्ट्राची आवश्यकता लक्षात आली. हे कार्य करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमामुळे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय वाढला आहे. पुढील वेळी तुम्हीच कार्यक्रमाची ‘लिंक’ सिद्ध करून आम्हाला द्या. आम्ही त्या कार्यक्रमाचा प्रसार करू.’’ श्री. पटेल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.