काँग्रेसचे सरकार असतांना चीनकडून लडाखमधील देपसांगवर नियंत्रण ! – डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

काँग्रेसने कधी चीनच्या आक्रमकतेचा विरोध केला आहे का ? – डॉ. स्वामी यांचा प्रश्‍न

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

नवी देहली – केंद्रातील भाजप सरकारवर टीका करतांना काँग्रेसने ५ सूत्रे मांडली होती; मात्र काँग्रेसने कधीही चीनच्या आक्रमकतेचा निषेध केला नाही. वर्ष २०१३ मध्ये लडाखमधील देपसांगवर चीनने नियंत्रण मिळवले होते. केंद्रात तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे काँग्रेसने स्वत:कडून झालेली चूकही स्वीकारली पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या चीनविषयीच्या एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांनी ही टीका केली आहे.

 

लडाखमधील देपसांग

१. दुसर्‍या एका ट्वीटमध्ये डॉ. स्वामी यांनी म्हटले की, काँग्रेसच्या नेत्यांनी कधी चीनच्या लडाखमधील आक्रमकतेचा विरोध केला आहे ? त्यांनी केलेली काही दुबळी विधाने मी ऐकली आहेत; परंतु त्यांच्यापैकी कुणीच चीनवर टीका करणारी धोरणात्मक विधाने केली नाहीत. काँग्रेसवाल्यांना याची भीती वाटते का की, त्यांचे सरकार असतांना चीनने डेपसांग येथे नियंत्रण मिळवले होते ?

२. काही दिवसांपूर्वी डॉ. स्वामी यांनी ट्वीट करतांना दावा केला होता की, लडाखमधील संघर्षाच्या ठिकाणावरून केवळ भारताने माघार घेतली आहे, तर चीन अधिक पुढे आला आहे.