कोल्हापूर-सोलापूर रेल्वे चालू करा ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर – कोल्हापूर ते सोलापूर जाणार्या अनेक गाड्या कोरोनामुळे १ वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांना सध्या कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे कोल्हापूर ते सोलापूर मार्गावरील जिल्ह्याच्या उन्नतीच्या दृष्टीने महत्त्वाची कोल्हापूर-सोलापूर रेल्वे चालू करावी, अशा मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता अल्प झाली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, गोंदिया, गोवा, देहली या ठिकाणी गाड्या धावत आहेत. त्याच पद्धतीने सोलापूर, पंढरपूरसारख्या आध्यात्मिक नगरीसाठी गाड्या चालू कराव्यात. कोल्हापूर-सोलापूर गाडी चालू झाल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. ही गाडी चालू झाल्यास येणार्या आषाढी एकादशीला भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन कोरोना संकट काळात आध्यात्मिक बळ मिळणार आहे. त्याचसमवेत मिरज-सोलापूर जलदगाडी अल्प प्रवाशांचे कारण देत बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. याविषयी आपण लक्ष घालावे.