मद्यपी शिपायाच्या चुकीमुळे ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास !
मद्य पिऊन येणार्या कर्मचार्यांवर कुणाचे लक्ष नसते का ? अशा कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
सातारा, १७ जून (वार्ता.) – जावळी तालुक्यातील सरताळे गावाला सामुहिक विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी येथील ग्रामपंचायत शिपाई कार्यरत आहेत; मात्र मद्याच्या नशेत ग्रामपंचायत शिपायाने विहिरीत १ किलो टी.सी.एल्. पावडर (जलशुद्धीकरण पावडर) टाकण्याऐवजी टी.सी.एल्.चे आख्खे पोते रिकामे केले. यामुळे सरताळे ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास चालू झाला.
ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. टी.सी.एल्. पावडरची अधिक मात्रा मिसळलेले पाणी प्यायल्यामुळे हा त्रास होत असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. जुलाब आणि उलट्या चालू झालेल्या ५० हून अधिक रुग्णांवर वाई, पाचवड आणि सातारा येथील विविध रुग्णालयांत उपचार चालू आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून काहीजण घरी परतले आहेत. केवळ दायित्वशून्य वृत्तीमुळे हा प्रकार घडला असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत शिपायावर कठोर कारवाई करणार ! – सतिश बुद्धे, गटविकास अधिकारी, जावळी
याविषयी जावळी येथील गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १५ जूनला रात्री आणि १६ जून या दिवशी सकाळी ग्रामपंचायत शिपायाकडून २ वेळा टी.सी.एल्. पावडर विहिरीमध्ये टाकण्यात आली. त्यामुळे नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. विहिरीतील पाण्याचा उपसा चालू करण्यात आला असून आरोग्य विभागाकडून गावातील घराघरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी चालू करण्यात आली आहे. अजून कुणाला लागण होऊ नये, यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे. घडलेल्या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत शिपायावर कठोर कारवाई करण्यात येईल.